esakal | दोन्ही ‘दादां’चे कर्जतमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून मुक मोर्चात आभार
sakal

बोलून बातमी शोधा

In Karjat MP Sujay Vikhe and MLA Rohit Pawar were thanked

शहरातील (मेन रोड) मुख्य रस्त्यावरील गाळेधारक व्यापाऱ्यांच्या वतीने सध्या प्रगतीपथावर असलेल्या भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याबाबत होणारा अन्याय व विविध  मागण्यांसाठी बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला.

दोन्ही ‘दादां’चे कर्जतमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून मुक मोर्चात आभार

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : शहरातील (मेन रोड) मुख्य रस्त्यावरील गाळेधारक व्यापाऱ्यांच्या वतीने सध्या प्रगतीपथावर असलेल्या भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याबाबत होणारा अन्याय व विविध  मागण्यांसाठी बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला. 

व्यापारी संघटना व विविध पक्षाच्या वतीने यावेळी उपअभियंता अमित निमकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी या मागण्यांना उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. 

आपल्या सर्व मागण्या तातडीने वरिष्ठांना कळवीत असून त्यांच्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपअभियंता निमकर यांनी आंदोलकांना दिले. ५० वर्षांपासून कर्जत शहरातील मेन रोडवर गाळे धारकांचे व्यवसाय सुरू आहेत. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. सध्या भिगवन कर्जत अमरापूर या रस्त्याचे काम शहरात सुरू होणार असून त्या कामासाठी दुतर्फा असलेल्या गाळ्यांना खुणा करून दिल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

यामुळे काही अघटित घटना होण्याचा संभव नाकारता येत नाही. विकास व्हावा यावर  दुमत नाही. मात्र या रस्त्यावरील व्यापारी आणि व्यापार जिवंत राहिला पाहिजे. यासाठी या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षभेद विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.

त्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, युवक काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले, शिवसेना तालुका प्रमुख दीपक शहाणे, माजी सरपंच संतोष म्हेत्रे, रिपाई तालुका प्रमुख संजय भैलूमे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, नगरसेवक डॉ. संदीप बरबडे, दादासाहेब सोनमाळी, सुनील शेलार, वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ भैलूमे, ॲड. संग्राम ढेरे यांची भाषणे झाली. 

यावेळी शिवसेना नेते बळीराम यादव, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, नगरसेविका उषा म्हेत्रे, बाजार समिती संचालक ॲड. हर्ष शेवाळे, ओंकार तोटे, अमृत काळदाते, अनिल गदादे यांच्यासह सर्व गाळेधारक व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली. उपाध्यक्ष विष्णुपंत नेटके यांनी आभार मानले.

आमदार व खासदारांचे आभार
कर्जत शहरातील मेन रस्त्यावरील गाळेधारक व्यापाऱ्यांची बैठक घेऊ नंतर सर्वांनुमते उचित निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत दादा पाटील महाविद्यालय ते अक्काबाई नगर (भांडे वाडी) पर्यंत सदर काम थांबविण्यात यावे या बाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार सदर काम शहरात थांबविण्यात आले आहे. याबद्दल उपस्थितांच्या वतीने खासदार डॉ. विखे पाटील आणि आमदार पवार यांचे आभार मानत विशेष अभिनंदन करण्यात आले.

संपादन : अशोक मुरुमकर