डोंगरची काळी मैना काळवंडली 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

पश्‍चिम भागातील घाटमाथ्यावर राजूर परिसरातील रंधा, माळेगाव जंगलात "डोंगरची काळी मैना' या नावाने ओळख असलेली करवंदे आता पिकू लागली आहेत. मात्र, निसर्गाने दिलेला हा अनमोल ठेवा कोरोनामुळे आदिवासींना मिळेनासा झाला आहे.

अकोले : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील घाटमाथ्यावर राजूर परिसरातील रंधा, माळेगाव जंगलात "डोंगरची काळी मैना' या नावाने ओळख असलेली करवंदे आता पिकू लागली आहेत. मात्र, निसर्गाने दिलेला हा अनमोल ठेवा कोरोनामुळे आदिवासींना मिळेनासा झाला आहे. 

वास्तविक, करवंदे पिकण्यास एप्रिल- मेमध्येच सुरवात होते. मात्र, यंदा अजूनही म्हणावी तशी ती पिकल्याचे दिसत नाही. करवंदे उशिरा पिकत असल्याने, यंदा पाऊस उशिरा सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे काही आदिवासी सांगतात. डोंगराळ भागात पिकणारा हा रानमेवा तसा दुर्मिळच; पण चवीला आंबटगोड असलेले हे छोटेसे फळ अनेकांचे आवडते आहे. डोंगरउताराला करवंदांच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी भरगच्च लगडल्या आहेत. 

शाळेला सुटी लागली, की बरीचशी मुले भल्या सकाळीच अनवाणी जात जंगलाची वाट धरतात. पाटीभर करवंदे काढायची आणि राजूर, कोतूळ, भंडारदरा येथील बाजारपेठेत नेऊन विकायची, असा त्यांचा नित्यक्रमच असतो. बसस्थानकात जोरात हाळी देत प्रवाशांना हा रानमेवा घेण्यासाठी विनवणी करीत फिरायचे. भंडारदरा व हरिश्‍चंद्रगडाकडे पर्यटनासाठी आलेले एखादे वाहन दिसले, की करवंदे विकणारी ही किलबिल टोळी त्याला गराडा घालते. 

पळस किंवा चांद्याच्या पानांपासून बनविलेल्या डोमाभर करवंदांसाठी साधारण पाच ते दहा रुपये मिळतात. दिवसभरात 100- 150 रुपयांचा गल्ला ही मुले जमवतातच. या पैशांतून शाळेचा खर्च भागवतात. शाळा सुरू झाल्या, की नवीन गणवेश, वह्या-पुस्तके घेतली जातात. काही चिमुकली घरखर्चासाठी आई-वडिलांना हातभार लावतात. उडदावणे, पांजरे, घाटघर, शिंगणवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महिलाही सकाळी सहा वाजेपासून काटेरी जाळ्यांत घुसून करवंदे काढत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे करवंदे झाडावरच सुकली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karwande tribals did not get it