भाजपसाठी खडसेंचा विषय क्लोज झालाय, राम शिंदेंचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

शहरातील शासकीय विश्रामगृहावर भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते व मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आदी नेते उपस्थित होते.

नगर ः भाजपचे कोणीही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. आमच्यासाठी खडसेंचा विषय आता भूतकाळ झाला आहे. भाजपसाठी हा विषय संपला आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. 

शहरातील शासकीय विश्रामगृहावर भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते व मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, ""नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यात जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांसंदर्भात चौकशी समिती नेमली होती. समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. पक्ष सध्या जो कार्यक्रम देत आहे, तो आम्ही पुढे नेत आहोत.'' 

राज्यात भाजप सरकार असताना, शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी एवढे मोठे नुकसान झालेले नव्हते. त्यामुळे आघाडी सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढविली पाहिजे.

शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत शांत बसणार नाही. जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. राज्य सरकारने शेती कर्जमाफीसाठी पोर्टल सुरू केले होते, ते बंद पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही, असे शिंदे म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadse's issue is closed for BJP, explains Ram Shinde