अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्यास अटक, तणाव निवळला

गौरव साळुंके
Friday, 23 October 2020

शहापूर तालुक्‍यातील अटगाव परिसरात बेपत्ता तरुणीसह संशयित आरोपी मोहिस सय्यद याला ताब्यात घेतले. अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सय्यद याच्यासह वरील पाच जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील भेर्डापूर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीला शोधण्यात तालुका पोलिसांना यश आले. बेपत्ता तरुणीसह संशयित आरोपीस तालुका पोलिसांनी आज पहाटे अटगाव (ता. शहापूर, जि. ठाणे) येथून ताब्यात घेतले. मोहिस सय्यद (वय 38, रा. बेलापूर) असे आरोपीचे नाव आहे. येथील तालुका पोलिस ठाण्यात आणून आज दुपारी आरोपीस अटक करण्यात आली.

तालुका पोलिसांनी पूर्वी भेर्डापूर येथून दोघांना, तर पढेगाव येथून एकाला अटक केली होती. भेर्डापूर परिसरातील अल्पवयीन तरुणीला फूस लावून बेलापूर येथील विवाहित तरुणाने शनिवारी (ता. 17) पळवून नेले होते. तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. तरुणीच्या शोधासाठी भेर्डापूर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 21) ठिय्या आंदोलन केले. 

त्याची दखल घेत तालुका पोलिस ठाण्यातून विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी पढेगाव येथून रियाजुद्दीन शेख (वय 22), भेर्डापूर येथून सागर तुपे (वय 21), गणेश बडाख (वय 23) आणि बेलापूर येथून लतीफ बागवान (वय 28) यांना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पथक काल रात्री ठाण्याकडे रवाना झाले.

शहापूर तालुक्‍यातील अटगाव परिसरात बेपत्ता तरुणीसह संशयित आरोपी मोहिस सय्यद याला ताब्यात घेतले. अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सय्यद याच्यासह वरील पाच जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सोमवारपर्यंत (ता. 26) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kidnapper of a minor girl was arrested from Thane