बांधावरुन वाद; डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून, नेवासे तालुक्यातील घटना

सुनील गर्जे
Wednesday, 30 December 2020

शेतीच्या बांधावरील रस्त्यावरून दोन शेतकरी कुटुंबात झालेल्या वादातून एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाड मारून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोधेगाव (ता. नेवासे) येथे घडली.

नेवासे (अहमदनगर) : शेतीच्या बांधावरील रस्त्यावरून दोन शेतकरी कुटुंबात झालेल्या वादातून एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाड मारून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोधेगाव (ता. नेवासे) येथे घडली. यातील संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.  दत्तात्रेय लक्ष्मण ठोंबरे असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

गंगाथाडी लागत असलेले गोधेगाव शिवारात येथील मयत ठोंबरे व महेश भिंगारदे यांची शेजारी-शेजारी शेतवस्ती व जमिनी आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली. यावेळी पूर्वपर असलेला बांधावरील वाहिवाटीच्या रस्त्यावरून या दोन कुटुंबियांत वाद झाला. तो काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला. दरम्यान मंगळवारी सायंकाळी याच रस्त्यावरून वादावादी झाली.  वादवादीचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी भिंगारदे यांच्या एका मुलाने दत्तात्रेय ठोंबरे त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्याचे समजते. कुर्हाडीचा घाव वर्मी लागल्याने ठोंबरे जागीच कोसळले. 

दरम्यान जखमी ठोंबरे यांना उपचारासाठी प्रथम नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे   माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
यातील सर्व संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले असून मयत ठोंबरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. नेवासे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killed of a farmer in Nevasa taluka