रागाच्या भरात पतीने कपाळावर मारला दांडा; पत्नी जागीच ठार

विलास कुलकर्णी
Saturday, 17 October 2020

देवळाली प्रवरा येथे शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजता किरकोळ कारणावरुन पती- पत्नीचे भांडण जुंपले.

राहुरी (अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथे शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजता किरकोळ कारणावरुन पती- पत्नीचे भांडण जुंपले. पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी आयताकृती दांडा मारला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. त्यानंतर तो फरार झाला होता.

त्याचा पोलिसांच्या तीन पथकांनी रात्रभर शोध घेऊन शनिवारी (ता. १७) सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. शितल बाबासाहेब गोलवड (वय ३५, रा. आंबी स्टोअर जवळ,  देवळाली प्रवरा) असे मृताचे तर  बाबासाहेब उर्फ पिंटू विठ्ठल गोलवड (वय ४०, रा. देवळाली प्रवरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पिंटू गोलवड एका हॉटेलमध्ये मजूरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो कायम पत्नीला मारहाण करायचा.  काल रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण जुंपले. घरात त्यांची आठ वर्षांची मुलगी व नऊ वर्षाचा मुलगा होता. त्यांची दहा वर्षांची मुलगी गुहा येथे मामाकडे होती.  रागाच्या भरात पिंटूने पत्नी शितलच्या डोक्यात लाकडी आयताकृती दांडा मारला. त्याच्या फटका कपाळावर बसला. वर्मी घाव बसल्याने, त्याची पत्नी जागीच कोसळली. घाबरलेल्या मुलांनी आरडाओरडा करुन, शेजाऱ्यांना बोलाविले. त्यामुळे आरोपी पिंटूने दुचाकी घेऊन घरातून धूम ठोकली.

घटनास्थळाच्या जवळ राहणारे देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी तातडीने राहुरी पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, परिविक्षाधीन उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या तीन पथकांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने आरोपीचा रात्रभर शोध घेतला.  परंतु, अंधारात आरोपी सापडला नाही.  

शनिवारी सकाळी आठ वाजता आरोपीची दुचाकी घरापासून एक किलोमीटर अंतरावर आंबी रस्त्यावर आढळली.  सकाळी साडेआठ वाजता स्थानिक तरुणांनी आरोपीला घराजवळील उसाच्या शेतात लपलेला पाहिला. त्याच्यावर नजर ठेवून तरुणांनी पोलिसांना कळविले.  सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने आरोपीला उसातून ताब्यात घेतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killer of wife by husband Deolali Pravara in Rahuri taluka