स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या बेडवर सरपण रचून उपोषण सुरु

सुहास वैद्य
Saturday, 3 October 2020

प्रवरानदीपात्रातील मोजमाप करून पंचनामे केले आहे. 74 लाखांचे अवैध वाळू उपसना-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.

कोल्हार (नगर) : प्रवरानदीपात्रातील मोजमाप करून पंचनामे केले आहे. 74 लाखांचे अवैध वाळू उपसना-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. परंतु महसूल विभागाने अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धानोरे (ता.राहुरी) येथील आदिनाथ भाऊसाहेब दिघे व सूर्यभान बाबुराव दिघे या गावक-यांनी गांधी जयंतीच्या दिवशी धानोरे येथील स्मशानभूमीच्या अंत्यविधीच्या बेडवर सरपण रचून आमरण उपोषण सुरु केले आहे.

याविषयी उपोषण कर्ते आदिनाथ दिघे आणि सूर्यभान दिघे यांनी सांगितले कि, सोनगाव व धानोरे हद्दीतील प्रवरानदीतील बेकायदा वाळू उप्श्याबाबत तसेच वाळू तस्करांना पाठीशी घालणारे मंडल अधिकारी व त्यावेळच्या तलाठ्यानविरुद्ध राहुरीच्या तहसीलदारांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या 15 जुलैला ग्रामस्थ बापूसाहेब शंकर दिघे व त्यांचे सहकारी तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्यांची दखल राहुरीच्या तहसीलदारांनी घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती. व प्रत्यक्ष प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाच्या खड्यांचे मोजमाप करून संबंधिताकडून वसुली करण्याची हमी दिल्यानंतर दिघे यांनी उपोषण सोडले होते. 

तथापि वर्षाचा कालावधी उलटूनही महसूलच्या अधिका-यांनी याप्रकरणी कोणतीही चौकशी न करता केवळ कागदी घोडे नाचविले आणि चौकशीचे नाटक केले. वाळू चोरीचे हे प्रकरण दडपण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे, असा आरोप उपोषण कर्ते दिघे यांनी केला आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत आमचे 'हे राम' आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनास मुळाप्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीने पाठींबा दिला आहे, असे दिघे यांनी सांगितले.

नदीतून जेसीबी यंत्राने वाळू उपसली. त्यामुळे मोठे खड्डे पडले आहे. उपसलेल्या वाळूची आकडेवारी महसूलच्या पंचनाम्यामध्ये आहे. रेशनच्या दुकानावरील किरकोळ कारणावरून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे अधिकारी प्रवरानदीतील लाखो रुपयांचा वाळू चोरीचा पंचनामा करूनही संबंधित वसुलीची कारवाई करण्यासाठी का टाळाटाळ करतात, असा प्रश्न आदिनाथ व सूर्यभान दिघे यांनी विचारला. महसूल विभागाच्या अनागोदी कारभारामुळे वाळू तस्करांचे फावले आहे. महसूलचे अधिकारी व एका तलाठ्याने संगनमत करून वाळू चोरांना पाठीशी घातले व वाळूची चोरी केली असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhar villagers have started a fast-unto-death in the cemetery