कोतकर म्हणतात, अमृत पाणी योजना प्रशासनामुळेच रखडली

अमित आवारी
Thursday, 26 November 2020

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर यांना या योजनेच्या कामावर निरीक्षक म्हणून नियुक्‍त केले आहे. अमृत योजनेतील कामांची आज कोतकर यांनी पाहणी केली. या वेळी सुधाकर भुसारे व अभियंते उपस्थित होते.

नगर ः केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी शहरासाठी अमृत पाणी योजना मंजूर केली. मात्र मुदत संपूनही, या योजनेतील निम्मी कामेही अजून पूर्ण झालेली नाहीत. "अमृत' योजनेच्या कामाला विलंब होण्यास महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी घरचा आहेर दिला. 

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर यांना या योजनेच्या कामावर निरीक्षक म्हणून नियुक्‍त केले आहे. अमृत योजनेतील कामांची कोतकर यांनी पाहणी केली. या वेळी सुधाकर भुसारे व अभियंते उपस्थित होते. 
कोतकर म्हणाले, ""शहराचा पुढील 50 वर्षांचा विचार करून ही पाणीयोजना मंजूर झाली. ठेकेदार व प्रशासकीय हलगर्जीपणामुळे योजनेच्या कामाला गती मिळत नाही. वारंवार सूचना करूनही प्रशासकीय यंत्रणा काम करीत नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी योजनेच्या कामात अडथळे आणले आहेत. ते सोडविण्याचे काम महापौर व आम्ही करीत आहोत. योजनेच्या कामाची वारंवार पाहणी करून सूचना केल्या जातात. मात्र, प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही. 
प्रशासनातील अधिकारी कार्यालयात बसून माहिती घेतात व कागदपत्रे रंगवितात. त्यामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळत नाही. चार वर्षे होऊनही अमृत पाणीयोजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 36पैकी 23 किलोमीटर पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले आहे. मुळा धरण येथील पंपिंगचे कामही बाकी आहे. पुढील सहा महिन्यांत ही योजना मार्गी लागावी, यासाठी प्रयत्नशील आहे. अधिकारी- ठेकेदारांनी जबाबदारी पार पाडावी, अन्यथा कारवाई करू, असा इशारा कोतकर यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kotkar says, the Amrit scheme was stalled due to the administration