
कुकडी कालवा सुमारे 249 किलोमिटर लांबीचा असून पारनेरसह जुन्नर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्यासाठी वरदान ठरला आहे.
पारनेर ः जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या कुकडी कालव्याची दूरवस्था झाली आहे. कालव्याला पारनेरसह इतरही तालुक्यात मोठ-मोठी खिंडारे पडली आहेत. तर, कालव्याच्या कडेला झाडे-झुडपे उगवली आहेत. त्यामुळे आवर्तनकाळात लाखो लिटर पाणी वाया जाते. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. गेल्या 40 वर्षात कालव्याच्या निर्मितीनंतर मोठी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे कालव्याची मोठी दुरावस्था झाली आहे.
कुकडी कालवा सुमारे 249 किलोमिटर लांबीचा असून पारनेरसह जुन्नर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. कालव्याखाली तालुक्यातील सुमारे 96 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. त्यामुळे हा परिसर सुजलाम-सुफलाम झाला.
हेही वाचा - आरे कारशेडचे विरोधकांकडून राजकारण
पारनेर तालुक्यात 1978 ते 8 0 सालाच्या सुमारास या कालव्याचे काम झाले आहे. तालुक्यात सुमारे 65 किलोमिटर लांबीचा कुकडी कालवा आहे. या कालव्या खाली निघोज आणि परिसरातील सुमारे 17 गावे ओलीताखाली आली.
या कालव्याची 2005-06 साली तात्पुरती जुजबी दुरुस्ती केली होती. मात्र, त्या नंतर दुरुस्ती झालीच नाही. परिणामी कालव्याची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कालव्यासाठी बांधण्यात आलेली आतील बाजूच्या दगडी भिंती कोसळल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणी सिमेंट भिंती बांधल्या आहेत त्यालाही अनेक वर्ष झाल्याने त्या सुद्धा उखडून गेल्या असल्याने कालव्यास मोठ-मोठी खिंडारे पडली आहेत. कालव्याच्या दुतर्फा झुडपे उगवली आहेत.
त्यामुळे आवर्तन काळात लाखो लिटर पाणी वाया जाते. जमिनीत पाझरते ओढ्या नाल्यांना वाहून जाते. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती केली नाही. ती दुरूस्ती तातडीने करावी, अशी मागणी कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे.
गतवर्षीच कलवादुरूस्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. दुरूस्ती होणे गरजेचे आहे. आर्थिक तरतूद नसल्याने दुरूस्ती करता येत नाही. कालव्याच्या कडेला झाडे उगवली असून कालव्यास मोठ-मोठी छिद्रे पडलेली आहेत. कालव्याची दुरूस्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. तसे वेगवेगळे प्रस्ताव पाठविले आहेत. निधी मिळाल्यानंतर तत्काळ दुरुस्ती केली जाईल.- प्रशांत कडूस, अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प