कुमशेतने पाणीदार आणि आदर्शवत गाव म्हणून निर्माण केली एक खास ओळख

शांताराम काळे
Wednesday, 30 September 2020

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यापासून ५५ कि.मी.वर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव.

अकोले (नगर) : टँकरचे गाव हे ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती, ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव म्हणून गावातील सरपंच सयाजी अस्वले व त्याच्या टीमने श्रमदान, एकोप्याने एकत्र येत या गावाला नव्याने ओळख करून  दिली आहे.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंकर  बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यापासून ५५ कि.मी.वर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे. दुष्काळापासून मुक्ती कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे.

पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.

जलसंधारणातून ठिकठिकाणी अडविले पाणी

कुमशेत गावात जरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी गावाला कायमस्वरूपी जानेवारी महिन्यापासूनच टँकरची मागणी करावी लागत होती. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी गावातील सर्व महिला पुरुष एकत्र करून सातत्याने बैठक घेऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या माध्यमातून नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले.

जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडवण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकते. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे, अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले यांनी दिली. 

संपादन -सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumshet village in Akole taluka is beginning to establish its identity as a water village