शेवगाव तालुक्यात का झाले पाणीच पाणी

The lakes in Shevgaon taluka are full
The lakes in Shevgaon taluka are full

शेवगाव : हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ओढे-नाले व नदया खळाळून वाहू लागले आहेत. तलाव बंधारे तुडूंब भरले अाहेत. आगामी वर्षभराची शेतीची व पाण्याची चिंता मिटल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले हे लोकप्रतिनिधी असतांना तालुक्यातील सर्वाधिक गावात बंधारे उभारुन जलसंधारणाच्या कामाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याने आता त्याची ख-या अर्थाने फलनिष्पती झाली आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षापासून संपूर्ण तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले होते. शेतीसाठीच काय पण पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने तालुक्यात दुष्काळ कायमस्वरुपी ठाण मांडून होता. मात्र, २००९ ते २०१४ या कार्यकाळात आमदार असतांना चंद्रशेखर घुले यांनी तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करत जलसंधारणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वाधिक निधी त्यांनी ओढे, नाले व नदयांवरील बंधा-यांवर खर्च केला. त्यातून तालुक्यातील ग्रामिण भागातील नदयांवर सुमारे ४० कोटी रुपये खर्चून ९३ बंधारे उभी केली. मात्र, पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी जास्त होत राहिल्याने अपवादात्मक परिस्थितीतच बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहिल्याचे चित्र दिसले. 

यंदा जूनमध्येच पावसाने तालुक्यात सर्वच भागात जोरदार हजेरी लावली अाहे. अगदी सुरुवातीलाच ओढे-नाले खळाळून वाहात आहेत. त्यामुळे तालुक्यातील लाडजळगाव भुमरे वस्ती, शेकटे, सुकळी, चेडे चांदगाव, ठाकुर पिंपळगाव, सुळे पिंपळगाव, अंतरावली, बेलगाव, आखेगाव, भगूर, वरुर या गावातील बंधारे तुडूंब भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील भुजलपातळीत वाढ झाली आहे.

आगामी वर्षभराचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने शेतक-यांमध्ये समाधान निर्माण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठीची महिलांची भटकंती ही थांबणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला वरदान ठरणा-या कोपरा धरण रद्द झाल्यानंतर त्याबदल्यात चंद्रशेखर घुलेंनी आपल्या कार्यकाळात विशेष प्रयत्न करुन ढोरानदीवर वडुले, वाघोली, ढोरजळगाव, लोळेगाव येथे १४ कोटी रुपये खर्चून साखळी बंधारे उभारले.

ढोरा नदी ही सुरुवातीलाच वाहती झाल्याने या बंधा-यातही पाणी साठवले जाणार आहे. त्याचा ही फायदा पश्चिम भागातील २० ते २५ गावांना होणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतक-यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला असून कधी नव्हे ते शेत शिवारे हिरवे दिसू लागले आहेत. 

आमदार मोनिका राजळे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गावात ६९ बंधारे व जलसंधारणाची कामे मार्गी लावली. त्यासाठी त्यांनी १६ कोटी १६ लाख इतका निधी या काळात खर्च केला.

माजी आमदार नरेंद्र घुले, जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या कार्यकाळातही जलसंधारणाच्या कामाला विशेष प्राधान्य दिल्याने तालुक्यातील शिवार जलमय होण्यासाठी मोठी मदत झाली.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीनेही दुष्काळग्रस्त शेवगाव तालुक्याच्या जलसंधारणाच्या कामासाठी सर्वोच्च प्राधान्य देवून वेगवेगळ्या गावातील सहा बंधा-यातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले. त्यात आव्हाणे खुर्द, अमरापूर, भगूर, आखेगाव, मंगरुळ, हसनापूर या गावांचा समावेश आहे. 

 

नानी नदीवर आखेगाव ते वडूलेपर्यंत बंधा-यांच्या मालिका माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कार्यकाळात झाल्या. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले. ही कामे या भागातील शेतकरी कधीही विसरु शकत नाहीत.  

 - मच्छिंद्र वावरे, शेतकरी वरुर. 
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com