पारनेरमध्ये लंकेंचा सतरा-झिरोचा दावा; कोणाचे किती येताय बघूच, औटीचेही चॅलेंज

मार्तंड बुचुडे
Saturday, 14 November 2020

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असली तरीही पारनेर नगरपंचायतीत आघाडी होणार नाही, हे जवळजवळ निश्चितच आहे.

पारनेर ः पारनेर नगरपंचायत निवडणुकीचे फटाके ऐन दिवाळीतच फूटू लागले आहेत. आमदार नीलेश लंके यांनी पारनेरचा पाणी प्रश्न मीच सोडवू शकतो असे सांगून नगरपंचायतीत 17-0 करणार असे जाहीर वक्तव्ये केले आहे.

माजी आमदार विजय औटी यांनी प्रथमच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाहेरून येऊन कोणी काहीही अश्वासन देईल. मात्र, मतदार जागृत आहेत. पारनेरच्या अस्मितेसाठी मतदारांना कोणाचे 17-0 करायचे हे चांगले समजते. आपण सर्वांनी एकदिलाने कामाला लागा सत्ता आपलीच आहे, असे सांगितले. 

राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असली तरीही पारनेर नगरपंचायतीत आघाडी होणार नाही, हे जवळजवळ निश्चितच आहे. त्यामुळे नगर पंचयातीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मध्यंतरी शिवसेनेचे पाच नगरसेवक फूटले होते.

त्यांनी थेट बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच तालुक्याचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावरून राज्यात आघाडीत मोठा गदारोळ झाला.

हे प्रकरण थेट राज्यातही खूप गाजले. शेवटी अघाडीत एकत्र काम करावयाचे असेल तर एकमेकांचे कार्यकर्ते फोडून चालणार नाही, असे सांगत राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये गेलेल्या या पाच नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले. त्यांची घरवापसी केली. मात्र, त्यांचे स्थानिक पक्षनेतृत्वाशी जमत नसल्याने ते मनाने शिवसेनेत आलेच नाहीत. ते आमदार लंके यांच्या सोबतच राहिले.

आताही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुक लढवतील याची सुताराम शक्यता नाही. दोन्ही पक्ष नेतृत्वांचे व कार्यकर्त्यांची मने जुळणे कठीण आहे. त्यामुळे ते नगरपंचायत एकमेकांच्या विरोधातच लढणार हे निश्चित आहे.

आमदार लंके यांनी पारनेर शहरासाठी ज्यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता होती, त्यांना साधा पारनेरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. हे सांगत मीच पारनेरसाठी कायम स्वरूपी पाणी आणल्याशिवाय राहाणार नाही. पारनेरचा चेहरामोहरा मीच बदलू शकतो असे जाहीर सांगत 17-0 ची भाषा सुरू केली आहे.

माजी आमदार औटी यांनी पारनेर शहराचा किती व कसा विकास केला हे पारनेरकरांना माहीत आहे. पूर्वीचे व आताचे पारनेर यातील फरक जनतेला ज्ञात आहे. मतदार सुज्ञ आहेत. मी काय केले हे मतदारांना चांगले माहीत आहे.

तालुक्याच्या नेतृत्वाने शहराला किती निधी दिला हे मतदारांना माहित आहे, असे सांगून शहराच्या अस्मितेसाठी मतदार स्थानिक नेतृत्वाबरोबर राहून 17-0 केल्याशिवाय राहाणार नाही असे कार्यकर्त्यांच्या बैठकित सांगितले आहे. त्यामुळे आता शहरावर सत्ता कोणाची येणार याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू झाली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lanke claims to have been elected in Parner