प्रवासी करनाक्यावर 'लटकूं'चा ताबा; शनीभक्तांची नाराजी, पोलिसांचे दुर्लक्ष

विनायक दरंदले 
Saturday, 16 January 2021

कोरोनाची भिती आता बरीच कमी होत असून दर्शनासाठी गर्दीचा ओघ वाढत आहे. व्यावसायिक स्पर्धा प्रचंड वाढली असून गावात व रस्त्यावर शंभरहून  अधिक लटकू सक्तीची अडवणूक करत आहेत.

सोनई (अहमदनगर) : शनीशिंगणापूर येथे बंद असलेल्या प्रवासी करनाक्यावर लटकूंनी ताबा घेतला असून येथे सक्तीची अडवणूक व दमदाटीचे प्रकार वाढू लागले आहेत. हा प्रकार तातडीने बंद व्हावा, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांनी केली आहे. 

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून ग्रामपंचायतीने प्रवासी करनाके बंद केलेले आहे. मात्र या बंदची संधी साधून शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावरील करनाक्यावर १५ ते २० लटकू थांबतात. आलेल्या वाहनाकडून २० ते ५० रुपये उकळून पुजेच्या साहित्यासाठी सक्ती केली जाते. येथे भक्तांना दमदाटी  व अरेरावीचे प्रकार होत असताना पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत व देवस्थानची सुरक्षा यंत्रणा कारवाई करत नाही हे विशेष. 

कोरोनाची भिती आता बरीच कमी होत असून दर्शनासाठी गर्दीचा ओघ वाढत आहे. व्यावसायिक स्पर्धा प्रचंड वाढली असून गावात व रस्त्यावर शंभरहून  अधिक लटकू सक्तीची अडवणूक करत आहेत. मागील महिन्यात पोलिसांनी चार-पाच लटकूवर कारवाई केल्यानंतर अडवणूक कमी झाली होती. आता पुन्हा नव्या जोमाने लटकू कार्यरत झाले आहे. 

कमी गर्दीमुळे करनाका बंद आहे. येथे होत असलेल्या अडवणूक बद्दल पोलिस ठाण्यास अनेकदा कळविले आहे. कारवाईत सातत्य असणे गरजेचे आहे. 
- बाळासाहेब बानकर, सरपंच, शिंगणापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latku have taken control of the closed passenger tax naka at Shanishinganapur