श्रीगोंद्यात जिल्हा बॅंक, कारखान्यांच्या निवडणुकांमुळे कार्यकर्ते वाऱ्यावर

संजय आ. काटे
Thursday, 14 January 2021

गावातील राजकारणाचा चढलेला फीव्हर आता शेवटच्या टप्प्यात असून, उमेदवार आणि कार्यकर्ते शेवटच्या रात्रीच्या नियोजनात गुंतले आहेत.

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होत आहे. या निवडणुकांत एरवी नेत्यांचा मोठा हस्तक्षेप राहतो. गावातील सत्ता आपल्याच कार्यकर्त्यांकडे राहावी, यासाठी फिल्डिंग लावून रसद पुरविणारे नेते यावेळी मात्र हात आखडता घेताना दिसले. आगामी जिल्हा सहकारी बॅंक, नागवडे व कुकडी कारखाना निवडणुका याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. नेत्यांच्या आर्थिक पाठिंब्यासह कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून, खर्चात कुठेही कमी न करता निवडणुकांचा आखाडा गाजत आहे. 

गावातील राजकारणाचा चढलेला फीव्हर आता शेवटच्या टप्प्यात असून, उमेदवार आणि कार्यकर्ते शेवटच्या रात्रीच्या नियोजनात गुंतले आहेत. 59 ग्रामपंचायतींच्या 567 जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी नऊ सदस्य असणारी ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. कामठी ग्रामपंचायतीमध्ये एका जागेसाठी उमेदवारच न मिळाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. 

तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 66 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, ते असे :

ढवळगाव- 9, ढोरजे- 8, म्हातारपिंप्री- 6, सुरोडी- 5, निमगाव खलू- 4, लिंपणगाव- 4, हिरडगाव- 4, गार- 4, चिखलठाणवाडी- 3, चोराची वाडी- 2, सांगवी दुमाला- 2, घोटवी- 2, निंबवी- 2, तसेच चिंभळे, येवती, चांभुर्डी, घोडेगाव, पिसोरेखांड, एरंडोली, गव्हाणेवाडी, कोसेगव्हाण, राजापूर, कामठी, चिखली येथील प्रत्येकी एक, अशा 66 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता 58 ग्रामपंचायतींच्या 500 जागांसाठी शुक्रवारी मतदान होईल. 

आता गावात लक्ष घातले, तर आगामी जिल्हा बॅंक व कारखान्यांच्या निवडणुकीत स्थानिक वाद उफाळून येण्याची भीती असल्याने, नेत्यांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते. जिल्हा बॅंक निवडणुकीचे ठराव असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता काही इच्छुक उमेदवार व नेते घेत असून, नागवडे व कुकडी कारखाना निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीतील रुसवा राहू नये, यासाठी सहकारातील राजकारणी बाजूला थांबल्याचे दिसते. 

नेत्यांचे थोडे दुर्लक्ष असले, तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिवावर निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. महिला मतदारांना संक्रांत सणाच्या पार्श्‍वभूमीवर साडी-चोळीचा आहेर आणि तरुणांना ढाब्यावरची पंगत, हे चित्र अनेक गावांत पाहायला मिळाले. अनेक तरुण उमेदवारांनी त्यांचा प्रचार डिजिटल करण्यावर भर दिल्याचे चित्र होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaders are said to be neglecting the district bank and factory elections in Shrigonde due to fears of local disputes