दोन हाणा पण पुढारी म्हणा, ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने गावोगावची स्थिती

Leaders were created due to elections in villages
Leaders were created due to elections in villages
Updated on

पारनेर ः कोरोनाच्या संकटामुळे तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर गेल्या. परिणामी, संबंधित गावांचा कारभार प्रशासकांच्या हातात गेला. मात्र, या निवडणुका कधीही होऊ शकतात, अशी शक्‍यता असल्याने गावोगाव अनेक जण आताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

गावागावात सामजिक कार्यकर्त्यांचे पेव फुटले आहे. सामाजिक कामांबाबत, प्रभागातील लोकांविषयी त्यांना अचानक जिव्हाळा निर्माण झाला आहे. कधीही न भेटणारे गावपुढारी मानसन्मान देत असल्याने गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 

तालुक्‍यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. पारनेर नगरपंचायतीचीही निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या मुदती कधीच संपल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्या ठिकाणी सध्या सरपंचांऐवजी सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत. मात्र, आता लवकरच या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इच्छुक "युवा नेत्यां'नी आतापासून अंगावर खादी चढवली आहे.

कधी नव्हे, ही मंडळी गावात चमकू लागली आहेत. काहींना अचानक गावातील सामाजिक कामांची उपरती झाली आहे. आपल्या प्रभागातील लोकांची कामे करणे, त्यांना काय हवे-नको, याची चौकशी करणे, त्यांची सरकारदरबारी अडकलेली वैयक्तिक कामे करून देण्यासाठी मदत करणे किंवा गावातील विविध सामाजिक, खासगी कार्यक्रमांना उपस्थित लावणे, असे प्रकार सुरू आहेत. कायम प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्‍लुप्त्या वापरल्या जात आहेत. 

जिल्हा परिषदेकडून आलेला निधी आम्हीच गावात आणला. असे सांगून विकासकामांचे श्रेय घेण्याचा, ती कामे गावात सुरू करण्याचा पायउतार झालेल्या सरपंच व सदस्यांनी सपाटा लावला आहे. त्यामुळे अनेकांची सरकारदरबारी किंवा ग्रामपंचायत पातळीवर अडकलेली कामे होत आहेत. त्यामुळे ही मंडळी सुखावली आहे. 

मतदारही झाले हुश्‍शार! 
मतदान कोणाला का करणे होईना, आपली कामे करून घ्या, अशी भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळे अनेकांनी अडकलेली घराची व लग्नाची नोंद, आधारकार्ड काढणे, मतदार नावनोंदणी करणे, शिधापत्रिका काढणे, नळजोड घेणे, जन्माची नोंद, अशी कामे इच्छूकांकडून करून घेण्याचा सपाटा लावला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com