esakal | नातवंडांवर बेतले ते कुत्र्यावर निभावले! शालिनी विखे पाटील यांच्या जवळच बिबट्याचा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard attack near Shalini Vikhe Patil

काळ आला होता; पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना आला. काळ अवघ्या पाच फुटांवर आला; मात्र सुदैवाने जिवावरचे कुत्र्यावर बेतले.

नातवंडांवर बेतले ते कुत्र्यावर निभावले! शालिनी विखे पाटील यांच्या जवळच बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : काळ आला होता; पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना आला. काळ अवघ्या पाच फुटांवर आला; मात्र सुदैवाने जिवावरचे कुत्र्यावर बेतले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षांचा चिरंजीव जयवर्धने हे बिबट्याच्या तावडीतून दुपारी थोडक्‍यात बचावले. त्यांच्यापासून अवघ्या पाच फुटांवर कुत्र्याची शिकार करून बिबट्या उसाच्या फडात दिसेनासा झाला. 

शालिनी विखे पाटील काल दुपारी अडीचच्या सुमारास लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत असताना हे नाट्य घडले. डोळ्याची पापणी लवते न लवते, तोच उसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. तिघांपासून अवघ्या पाच फुटांवरील कुत्र्याला जबड्यात पकडून तो क्षणात उसात दिसेनासा झाला. कुत्रा मध्ये आला नसता तर... या जाणिवेने तेथे उपस्थित सर्वच सुन्न झाले. 

घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच आजूबाजूचे लोक गोळा झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. विखे पाटील यांनीही शेताकडे धाव घेतली. वनाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. उसाच्या फडाभोवती दोन पिंजरे लावून त्यात भक्ष्य ठेवण्यात आले. 
"सकाळ'शी बोलताना शालिनी विखे पाटील म्हणाल्या, ""नातवंडांना सोबत घेऊन शेतात गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना जेवू घालण्यासाठी उसाच्या फडाजवळ बसले होते.

समोर कुंपण घालण्याचे काम सुरू होते. नातवंडे जेवत असताना, पाच फुटांवर कुत्रे येऊन थांबले. खासदार डॉ. सुजय यांची कन्या अनिशा हिला त्याला दगड मारून हाकलण्यास सांगितले. ती हातात दगड घेऊन उभी राहिली. दगड मारण्यासाठी हात उंचावला आणि काही समजण्यापूर्वीच आमच्यापासून 15-20 फुटांवर उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली. काही समजण्यापूर्वीच कुत्र्याला जबड्यात पकडून आल्या पावली उसाच्या फडात दिसेनासा झाला. 
देवाच्या कृपेने कुत्रे मध्ये आले, अन्यथा...? काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. ग्रामदैवत म्हसोबाच्या कृपेने फार मोठे विघ्न टळले.'' 

सहा वर्षांच्या दोन्ही नातवंडांना घडलेल्या प्रकाराची काहीच कल्पना आली नाही. ते मला विचारत होते, "आजी कुत्री का भांडत होती? त्यातील एकाने दुसऱ्याला तोंडात धरून उसात का नेले?' त्यांच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे नव्हती. आमच्या कुटुंबावरील फार मोठे संकट टळले. काही काळ मीदेखील सुन्न झाले. नंतर स्वतःला सावरले. नातवंडांना सोबत घेऊन तेथून लगेच बाजूला झाले,'' असे त्या म्हणाल्या. 

लोकांच्या आशीर्वादाने संकट टळले 
शालिनी विखे पाटील म्हणाल्या, ""आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय अहोरात्र गोरगरिबांसाठी झटतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. विखे घराण्याची चौथी पिढी आज सामान्य लोकांचा दुवा घेते आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मोठे संकट टळले.''

संपादन : अशोक मुरुमकर