
राजूर-चितळवेढा हद्दीवरील खंडेराव मंदिराजवळ सायंकाळी बिबट्याने खुराड्यात घुसून कोंबडीवर ताव मारला.
अकोले (अहमदनगर) : राजूर-चितळवेढा हद्दीवरील खंडेराव मंदिराजवळ सायंकाळी बिबट्याने खुराड्यात घुसून कोंबडीवर ताव मारला. बिबट्याच्या रुपाने साक्षात मृत्यू समोर पाहून कोंबड्यांचा मालक वाट फुटेल, तिकडे पळत सुटला. काहीही झाले, तरी पुन्हा शेतात यायचे नाही, असा निर्णय मालकाने घेतला.
खंडेराव मंदिराजवळ आज सायंकाळी हौशीराम भारमल शेतातील खुराडे बंद करीत असतानाच, अचानक बिबट्या तेथे हजर झाला. थेट खुराड्यात घुसून कोंबडीला उचलून पसार झाला. अचानक बिबट्याने पुढ्यात झेप मारल्याने भारमल यांची बोबडीच वळली.
बिबट्याचा रुद्रावतार पाहून वाट दिसेल, तिकडे ते धावत सुटले. कसेतरी ते घरी पोचले. शेतात पूर्वी तरस येत; पण आम्ही त्यांना हुसकावून लावायचो. मात्र, आता पुन्हा सायंकाळी शेतात जाणार नाही, असे म्हणत भारमल यांनी आता कोंबड्या विकण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर