राजेगावमध्ये घबराट निर्माण केलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात

विनायक दरंदले
Tuesday, 17 November 2020

राजेगाव (ता. नेवासे) येथे अनेक दिवसापासून ग्रामस्थांत घबराट निर्माण करत असलेला बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री अडकला आहे.

सोनई (अहमदनगर) : राजेगाव (ता. नेवासे) येथे अनेक दिवसापासून ग्रामस्थांत घबराट निर्माण करत असलेला बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री अडकला आहे. गेल्या महिन्यापासून राजेगाव, शिंगवेतुकाई व पांगरमल परीसरात रोजच बिबट्याचे दर्शन होत होते. त्याने अनेक शेळ्या, मेंढ्या व कुत्रे फस्त केले आहे.

बिबट्याच्या भितीने शेतीचे कामे ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मुश्ताक सय्यद, कर्मचारी चांगदेव ढेरे, ज्ञानदेव गाडे, सयाजी मोरे, चंद्रकांत गाडे, मुक्ताजी मोरे यांनी अजय अव्हाड यांच्या वस्तीजवळ चार दिवसापूर्वी पिंजरा लावला होता.

सोमवारी (ता. १६) रात्री दहा वाजता तीन वर्षाची मादी पिंजर्यात ठेवलेल्या शेळीच्या आवाजाने आली. झेप घेतली आणि पिंजऱ्यात अडकली. रात्री मादी बिबट्याला पाहण्यास बघ्यांची गर्दी जमा झाली होती. आज सकाळी बिबट्यास वैद्यकीय तपासणी व किरकोळ उपचारासाठी लोहगाव येथील नर्सरीत नेण्यात आले आहे. तालुक्यात सध्या चांदा, महालक्ष्मीहिवरे, देडगाव, अंमळनेर, नांदुरशिकारी, पाचेगाव व नेवासे बुद्रुक येथे वन विभागाने पिंजरे लावलेले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard that created panic in Rajegaon is finally in a cage