प्रवरा नदीपट्यात बिबट्याची दहशत; आणखी किती जीव घेतल्यावर वनविभागाला जाग येणार, शिवसैनिकांचा संतप्त सवाल

गौरव साळुंके
Saturday, 21 November 2020

श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीपट्यातील अनेक गावशिवारात गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याची दहशत कायम आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील प्रवरा नदीपट्यातील अनेक गावशिवारात गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याची दहशत कायम आहे. नदी परिसरातील आंबी (ता.राहुरी) अमळनेर, दवणगाव, केसापूर शिवारात सध्या बिबट्याचे हल्ले वाढल्याने भितीचे वातावरण परसले आहे. दवणगाव येथील वैभव कासार काल आपल्या शेतात टॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करीत असताना दुपारच्या सुमारास त्याला बिबट्याने दर्शन घडले.

साधारण दीड एकर क्षेत्राची नांगरणी होईपर्यंत बिबट्या टॅक्टरभोवती फिरकत असल्याचे वैभव यांने सांगितले. जीव मुठीत धरुन वैभवने टॅक्टर चालूच ठेवूत बिबट्या पासून आपली सुटका करुन घेतली. तसेच हल्ला चढवून बिबट्याने परिसरातील एका चिमुरडीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आजपर्यंत बिबट्याने परिसरातील शेकडो शेळ्या, मेंढ्या, कालवडीवर हल्ला चढवुन फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बिबट्याच्या धास्तीने शेतातील कामे करण्यास शेतकरी आणि शेतमजूर धीर धरत नाही. बिबट्याच्या धास्तीने अनेक शेतकर्यांची शेतीकामे थांबली आहेत. शिवारातील कामे जीव धोक्यात घालून करावी लागत आहे. परंतू बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने अद्याप कुठलीही दक्षता घेतली नसुन बिबट्याने आणखी किती जणांचे जीव घेतल्यावर वनविभागाला जाग येईल, असा संतप्त सवाल शिवसेनेचे पदाधिकारी अनिल खपके, सुनील खपके, मच्छिंद्र कासार, दत्तात्रय डुकरे, बाळासाहेब जाधव, अण्णा कोळसे, कुंडलिक खपके, प्रदीप खपके, बाळासाहेब पांडागळे यांनी केला आहे.

प्रवरा नदीपट्यातील बिबट्यांचे सर्वेक्षण करुन बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी संदीप खपके, नितीन खपके, धनंजय औताडे, प्रदीप होन, संतोष खपके, अमोल खर्डे यांनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard infestation in Shrirampur taluka