धक्कादायक ः आजोबाच्या कुशीत झोपलेल्या नातवाला बिबट्याने नेलं उचलून

धक्कादायक ः आजोबाच्या कुशीत झोपलेल्या नातवाला बिबट्याने नेलं उचलून

पाथर्डी : तालुक्‍यातील केळवंडी येथे घराच्या पडवीत आजोबांच्या कुशीत झोपलेल्या आठ वर्षीय चिमुरड्यास आज पहाटे बिबट्याने अलगद उचलून नेले. हा प्रकार लक्षात येताच, नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, पावसाची रिमझिम व अंधारामुळे बिबट्या पसार झाला.

सक्षम गणेश आठरे (वय 8) असे या चिमुरड्याचे नाव आहे. दरम्यान, आज सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सक्षमचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे दसरा सणाच्या दिवशी केळवंडी गावावर शोककळा पसरली. बिबट्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. 

केळवंडी येथील गणेश आठरे हे एसटी चालक आहेत. त्यांचे कुटुंब पाथर्डी-माणिकदौंडी रस्त्यावर केळवंडी शिवारात राहते. सक्षम यास काल (रविवार) रात्री उलट्याचा त्रास होत असल्याने तो घराबाहेर पडवीत आजोबाच्या कुशीत झोपला.

बिबट्याने आज पहाटे तीनच्या सुमारास सक्षमला आजोबांपासून उचलले. जागा झालेल्या सक्षमने आरडाओरडा केल्याने आजोबा उठले. समोरील प्रकार पाहून हादरले. त्यांचा आरडाओरडा ऐकून प्रदीप आठरे व पोपट आठरे धावले. त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, अंधारात तो पसार झाला. रात्रभर ग्रामस्थ सक्षमचा शोध घेत होते. मात्र, पावसाची रिमझिम सुरू असल्याने व अंधारामुळे सक्षम सापडला नाही. 

आज सकाळी सहाच्या सुमारास घरापासून शंभर मीटरवर शेतात बिबट्याने खाल्ल्याने अर्धनट अवस्थेत सक्षमचा मृतदेह आढळून आला. वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी बिबट्याचा शोध घेतला असता, बिबट्या शेतातच दबा धरून बसलेला होता. जमावास पाहून डोंगराच्या दिशेने तो गायब झाला. उत्तरिय तपासणीसाठी सक्षमचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. 


केळवंडी येथे चार दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली होती. त्याची कल्पना वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. रांजणी येथेही पाच दिवसांपूर्वी बिबट्याने एक शेळी ठार केली. वन विभागाने वेळीच दक्षता घेतली असती, तर सक्षम वाचला असता. 
- प्रदीप आठरे, माजी सरपंच, केळवंडी, पाथर्डी 

 
बिबट्याच्या हल्ल्यात सक्षम आठरे याचा मृत्यू झाला. आम्ही सकाळी बिबट्याचा माग घेत बिबट्यास पिटाळून लावले. पिंजरा लावून बिबट्याला पकडले जाईल. नागरिकांनी शेतात एकटे जावू नये. 
- शिरीष निरभवने, वनपरिक्षेत्र अधिकारी, पाथर्डी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com