शिष्यवृत्तीचा टक्का वाढीसाठी पहिली अन्‌ पाचवीपासून धडे आवश्‍यक

दौलत झावरे
Saturday, 31 October 2020

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न केले जात आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न केले जात आहे. त्याला काही अंशी यश आलेले असून ते यश कायम रहावे, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. निकालाचा टक्का वाढता ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिली अन्‌ पाचवीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धडे देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

जिल्हा परिषदेसह खासगी, नगरपालिका व महापालिका शाळांतील शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का उंचावण्यासाठी शिक्षण विभागासह प्रशासनाने विशेष परिश्रम घेतलेले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात निकालाचा टक्का वाढलेला असून त्यात आणखी वाढ व्हावी, यासाठी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविण्याचे उद्दीष्ट दिलेले आहे. तसेच सराव परीक्षेच्या निकालाचे विश्‍लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केलेली आहे. त्याबरोबरच व्हॉटस ऍप ग्रुपच्या माध्यमातून तालुकानिहाय शाळांच्या तयारीचा आढावा घेतला जात असून तालुकास्तरावरही शिष्यवृत्ती कार्यशाळा व सराव परीक्षेचे नियोजन केले जात आहे. परिणामी 2018-20दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात 9.48 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

हेच सकारात्मक परिणाम दिसत असले तरी "तहान लागल्यावर विहिर खांदणे' या म्हणी प्रमाणे सध्या शिक्षण विभागाच्या उपाययोजना ठरत आहे. शिष्यवृत्तीचा टक्का उंचावायचा कायम स्वरुपी उंचावून तो तसाच राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिली अन्‌ पाचवीपासूनच शिष्यवृत्तीचे धडे दिल्यास पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल वाढणार आहे. हा वाढता टक्का कायमस्वरुपी टिकविणारा आहे.

पहिलीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धडे वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) शाळेत दिले जात असल्याने तेथील शिष्यवृत्तीचा निकाल वाढता आहे. हाच उपक्रम आपल्या जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अवलंबिला जात असून त्याची अंमलबजावणी जिल्हाभर होणे गरजेचे आहे. तसे केल्यास आगामी काही वर्षात शिष्यवृत्तीचा टक्का उंचावणारा ठरणार असून त्यावर आता शिक्षण विभागाने कामकाज करणे महत्वाचे ठरणार आहे. 

जिल्ह्यातील शिष्यवृत्तीचा टक्का उंचाविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करण्यात आलेले असून त्यात यश आलेले आहे. दरवर्षीच निकाला टक्का वाढत आहे. वाबळेवाडी शाळेत पहिलीपासूनच शिष्यवृत्तीचे धडे दिले जात असून आपल्या जिल्ह्यातील सुमारे 50 शाळांनी वाबळेवाडीला शाळेला भेट दिल्यानंतर तो उपक्रम राबविण्यास सुरवात केलेली आहे. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lessons from 1st to 5th are required to increase the percentage of scholarship