मुख्यामंत्र्यांना सरकारमधील ‘हे’ नेते खरी माहीती देत नाहीत; कोणी केलाय आरोप वाचा

सनी सोनावळे
Tuesday, 11 August 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधप्रश्नाबाबत सरकारमधील काही नेते वास्तववादी माहिती देत नाहीत.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधप्रश्नाबाबत सरकारमधील काही नेते वास्तववादी माहिती देत नाहीत. त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघांचेच हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असल्याने दुध दराबाबतचा निर्णय घेण्यात विलंब होत आहे. आता दुध उत्पादकांच्या व्यथा समजण्यासाठी अहिंसाच्या मार्गाने आंदोलन करत लेटर टु सीएम हे अभियान राबविणार असल्याचे शेतकरी नेते अनिल देठे यांनी सांगितले.
 

राज्यातील शेतकरी नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेणात आल्याचे देठे यांनी सांगितले. या बैठकीत राज्यात १३ ऑगस्ट पासुन १८ ऑगस्टपर्यंत लेटर टू सीएम हे आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. या आंदोलना दरम्यान राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आपापल्या गायींच्या गोठ्यातुनच मोठ्या प्रमाणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र तसेच ई-मेल पाठवून राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्यां व्यथा मांडणार आहेत.
 

शेतकऱ्यांना कोरोनाच्या महासंकटात आधार देण्यासाठी दुधाला प्रतिलीटर ३० रूपये दर देण्याची मागणी करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक स्वरूपाचे व संख्येचे आंदोलन करण्यास मर्यादा येत असल्याने राज्य सरकार जाणीवपूर्वक दुध दराबाबतचा तिढा सोडवण्यासाठी विलंब करत असल्यानेच दुध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागत आहे.
 

या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुध दरवाढीच्या संदर्भात सकारात्मक भुमिका घेतली नाही तर संयमाने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा दुध उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ऑनलाईन बैठकीत शेतकरी नेत्यांनी सरकारला दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to be sent to Chief Minister Uddhav Thackeray from 13 th August