आमदार मोनिका राजळे यांची नुकसान भरपाई देण्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र

सचिन सातपुते
Wednesday, 23 September 2020

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणासाठी संपादीत न केलेल्या शेत जमिनीत धरणाचे पाणी शिरुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेवगाव (अहमदनगर) : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणासाठी संपादीत न केलेल्या शेत जमिनीत धरणाचे पाणी शिरुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे पिके सडल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जावून हातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा मागणीचे पत्र आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले. 

जायकवाडी धरणाच्या निर्मीतीच्या वेळी तालुक्यातील 20 ते 22 गावातील सूपीक जमीन संपादीत करण्यात आली. शेतकऱ्यांनी सुपीक जमिनी देऊन केलेल्या त्यागामुळे मराठवाडयातील हजारो एकर जमीन जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली आल्याने सुजलामसुफलाम झाली. अनेक शेतकऱ्यांना धरणासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच धरणात मोठया प्रमाणावर गाळ साचून ते उथळ झाले आहे. त्यामुळे धरण 90 टक्यापेक्षा जास्त भरल्यानंतर त्याचे पाणी परिसरातील शेतक-यांच्या असंपादीत केलेल्या शेतजमीनीत शिरते. 

यावर्षी धरण पूर्मक्षमतेने भरल्यामुळे शेतक-यांच्या असंपादीत जमिनीतील ऊस, कपाशी, बाजरी, तुर, मका यांच्यासह फळबागांमध्ये पाणी जावून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन चार वर्षापासून शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसाठी केलेला अमाप खर्च वाया गेल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे होवून नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे. 

याबाबतचे पत्र पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्यासह, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, तहसिलदार शेवगाव आदींना देण्यात आले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to Minister Vijay Vadettiwar to compensate MLA Monica Rajale