एकच काम, दोघांना वेगवेगळी निवेदने; पवार की विखे करणार सोडवणूक?

नीलेश दिवटे
Monday, 24 August 2020

भिगवन- खेड- अमरापूर रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांच्याकडे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन पाठविले आहे.

कर्जत (अहमदनगर) : शहरातून जाणाऱ्या भिगवन- खेड- अमरापूर रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांच्याकडे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन पाठविले आहे.

नामदेव राऊत यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत सदर रस्त्याच्या दुतर्फा असणारे गाळे (टपरी) धारक सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. येथे सर्वसामान्य युवक व्यवसाय करीत असून त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे.

सध्या कोरोनाच्या महामारी मुळे सततच्या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून कर्जाचे हप्ते थकले आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला खुणा केल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी 1996- 97 मध्ये सदर रस्ता रुंदी करण करते वेळीबस स्थानकाच्या संरक्षक भिंती लगतं असणारे गाळ्यांची रांग तत्कालीन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून व तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून जैसे थे परिस्थिती ठेवीत न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले होते. त्यामुळे आजतागायत या व्यवसायिकांचया कुटुंबाची उपजीविका सुरू आहे. हे गाळे उध्वस्त झाले तर 325 गाळे धारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. तरी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदार रोहित पवार यांना निवेदन देताना म्हटले, की या अगोदर सदर रस्ता रुंदीकरणाचे वेळी तत्कालीन आमदार (स्व) विठ्ठलराव भैलूमे यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायतचा मी सरपंच व उपसरपंच असताना तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे व प्रा. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले होते. आजतागायत हे सर्व कुटुंबाची उपजीविका सुरु आहे. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण आमदार असल्याने न्याय देऊ शकता.

शहरात शॉपिंग सेंटर उभारणार आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र ते एसटी महामंडळ, जिल्हा परिषद, नगरपंचायत व शासकीय जागेत उभारले तर ते मालक असतील. मात्र सध्या या जागेतील गळ्यांचे ते गाळे धारकच मालक आहेत.शहराला पर्यायी मार्ग बायपास साठी दोन तीन पर्याय आहेत.तो करून या गाळे धारकांना न्याय द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to MLA Rohit Pawar and MP Sujay Vikhe for road works in Karjat taluka