पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मोफत बस; आमदार लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मार्तंड बुचुडे 
Saturday, 5 September 2020

राज्य व राष्ट्रीय गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच दोन वेतनवाढी व प्रवासासाठी मोफत बससेवा पास मिळावा.

पारनेर (अहमदनगर) : राज्य व राष्ट्रीय गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच दोन वेतनवाढी व प्रवासासाठी मोफत बससेवा पास मिळावा. त्याबरोबर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रेल्वे प्रवासातही सवलत मिळावी, अशा मागणीचे पत्र आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

आमदार लंके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यात लंके यांनी म्हटले आहे की, राज्यातील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दरवर्षी ५ सप्टेंबरला दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण केले जाते. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांना अशा स्वरूपाचे पुरस्कार दिले जातात. भविष्यात या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम करावे व त्यासाठी त्यांना प्रोहत्सान मिळावे यासाठी त्यांचा पुरस्कार देउन यथोचित सन्मान केला जातो.

या पुर्वीच्या 30 एप्रील 2084 च्या सरकारन निर्णयानुसार अशा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन वाढ देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांना त्या मिळतही होत्या. 
त्यानंतर ४ सप्टेंबर 2014 च्या सरकार निर्णयानुसार आगाऊ वेतन वाढी ऐवजी एकरकमी ठोक रक्कम देण्याचा सरकारचा निर्णय झाला. तो निर्णय 2013- 14 पासून लागू करण्यात आला होता. आमदार लंके यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, माझ्याकडे अशा अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी पूर्वी प्रमाणेच शिक्षकांना दोन वेतवाढी देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

त्यामुळे अशा शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबयांना बस प्रवास सुद्धा मोफत करण्याची सवलत मिळावी तसेच रेल्वे प्रवासातही सवलत मिळावी. त्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करावा. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परीषदेच्या शिक्षक व गुणवत्ता समितीवर निमंत्रीत सदस्य म्हणून घेण्यात यावे. याबाबत सरकार पातळीवर निर्णय करण्यात यावा, अशी मागणी आमदार लंके यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter written by MLA Nilesh Lanke to Chief Minister Uddhav Thackeray