
राज्य सरकारने माजी सैनिक, तसेच हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी यांना मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर : राज्य सरकारने माजी सैनिक, तसेच हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी यांना मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश नगरविकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविला आहे. मात्र, महापालिकेकडून या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना स्मरणपत्र पाठविले आहे.
स्मरणपत्रात म्हटले आहे, की राज्यातील माजी सैनिकांनी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण केले. त्यामुळे ग्रामविकास विभागाने राज्यातील माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभागाने राज्यातील नागरी स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी सैनिकांसाठी राज्याकडून राबविण्यात येणाऱ्या मालमत्ताकरातून सूट देण्याच्या योजनांचे एकसूत्रीकरण करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु या सरकारी निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर महापालिकेकडून एकप्रकारे अन्याय होत आहे. याबाबत महापालिकेने शासन निर्णयान्वये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर