तुम्ही राहुरीतून भगरपीठ तर आणलं नाही ना? विषबाधा झाल्याने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित

विलास कुलकर्णी
Tuesday, 20 October 2020

राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, शेटेवाडी (देवळाली प्रवरा), गुहा, चिंचोली, तांभेरे, मुसळवाडी, गंगापूर अशा विविध गावांमध्ये किराणा दुकानांमधून भगर पिठ खरेदी केलेल्या नागरिकांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. 17) रात्री विषबाधेचा प्रकार घडला.

राहुरी :भगर पीठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता 'अक्षय ट्रेडर्स' चा परवाना निलंबित केला. त्यांनी विक्री केलेले 1400 किलो भगरपीठ परत बोलविण्यास सांगितले.

किरकोळ दुकानांमधून भगर पिठाचे नमुने ताब्यात घेऊन, पुणे येथे शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. तपासणीत आरोग्यास घातक पदार्थ आढळल्यास, ठोक विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला जाईल. काही आढळले नाही. तरी दंडात्मक कारवाईची शिफारस केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांवरही खटले दाखल केले जातील, असे नगरचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, शेटेवाडी (देवळाली प्रवरा), गुहा, चिंचोली, तांभेरे, मुसळवाडी, गंगापूर अशा विविध गावांमध्ये किराणा दुकानांमधून भगर पिठ खरेदी केलेल्या नागरिकांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. 17) रात्री विषबाधेचा प्रकार घडला.

रविवारी (ता. 18) शेकडो नागरिक मळमळ, उलट्या, जुलाबाने त्रस्त झाले. म्हैसगांव येथे सर्वाधिक 58 जणांना विषबाधा झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी तातडीने धाव घेतली.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने म्हैसगाव येथे बाळासाहेब गागरे यांच्या मातोश्री सुपर मार्केटमध्ये 29 किलो व बापूसाहेब जाधव यांच्या सचिन किराणा स्टोअर्स मध्ये 6 किलो भगरपीठ जप्त केले. पांढरी येथे रवींद्र मुसमाडे यांच्या श्रीराम किराणा व जनरल स्टोअरमध्ये भगरपीठ साठा आढळला नाही. तिन्ही दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना विकलेले भगरपीठ परत घेण्याचे आदेश दिले. 

राहुरी फॅक्टरी येथे 'अक्षय ट्रेडर्स' या ठोक विक्रेत्याकडे भगरपीठ साठा आढळला नाही. त्यांनी अरिहंत फुड्स इंडस्ट्रीज, दिंडोरी, नाशिक त्यांच्याकडून भगर खरेदी करून, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्‍टोबर दरम्यान सन्मती फूड्स इंडस्ट्रीज, श्रीरामपूर यांच्याकडून दळून घेतली. एक किलो पॉलिथिन बॅगमध्ये 1400 किलो भगरपीठ विक्रीसाठी प्राप्त केले.

11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान किरकोळ व्यापाऱ्यांना व ग्राहकांना विक्री केली. त्यांनी उत्पादित व विक्री केलेल्या भगर पिठामुळे अनेक लोकांना उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास झाले. जनतेचे आरोग्य धोक्यात आणले. त्यामुळे 18 ऑक्टोबर रात्री साडेआठ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय शिंदे यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The license of the trader selling bhagar is suspended