कट्टर विरोधक विखे-थोरात गट झाले एक

आनंद गायकवाड 
Thursday, 14 January 2021

खळी ग्रामपंचायतीत तीन प्रभागांतील नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्नही सुरू होते. त्याला नेत्यांनी होकार दिला होता; मात्र सुकाणू समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांती केवळ पाच जागा बिनविरोध करण्यात राजेंद्र चकोर व सुरेश नागरे यांना यश आले.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍याच्या पूर्व भागातील खळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यात अपयश आल्याने, स्थानिक पातळीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी गावाचा विकास केंद्रस्थानी मानून युती केली आहे. कट्टर विरोधकांच्या या आगळ्यावेगळ्या युतीची चर्चा तालुक्‍यात आहे.
 
खळी ग्रामपंचायतीत तीन प्रभागांतील नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्नही सुरू होते. त्याला नेत्यांनी होकार दिला होता; मात्र सुकाणू समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांती केवळ पाच जागा बिनविरोध करण्यात राजेंद्र चकोर व सुरेश नागरे यांना यश आले. प्रभाग 2 व 3 मधील 4 जागांबाबत एकमत न झाल्याने त्यासाठी निवडणूक होत आहे. त्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामविकास पॅनल उभे केले आहे. या पॅनलच्या फलकांवर विखे व थोरात यांची छायाचित्रे झळकत आहेत. 

स्थानिक निवडणुकीतील आरोप- प्रत्यारोपांमुळे नंतर कटुता निर्माण होते. हे टाळून विकासाला महत्त्व देत, दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. 
- राजेंद्र चकोर, कॉंग्रेस 

गावाचा विकास केंद्रस्थानी मानून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात अपयश आल्याने, आता दोन्ही गट चांगल्या उद्देशाने एकत्र आले आहेत. 
- शरद नागरे, भाजप 

खळी गावाचा विकास खुंटला असून, येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याने, परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सोमनाथ नागरे, परिवर्तन पॅनल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the local level activists of MLA Radhakrishna Vikhe Patil and Revenue Minister Balasaheb Thorat have formed an alliance with the village development at the center