
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील संघाचे कार्यालय काही वर्षांपूर्वी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात होते. याच संघाच्या कार्यालयातून अनेक गरजू लाभार्थींना कर्ज मिळत होते.
श्रीगोंदे : तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. पाच महिन्यांपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड झाली. मात्र, पहिल्याच बैठकीत नवीन अध्यक्षांऐवजी संचालकांना सह्यांचे अधिकार आले. त्यात येथे असणाऱ्या सचिवांकडे पाच तालुक्यांचा कारभार आहे. संचालकांचे राजकारण सुरू असतानाच सचिवांना येथे येण्यास वेळ नसल्याने कार्यालयाला कायमच कुलूप लागलेले असते.
हेही वाचा - महादेव जानकरांना दोन खासदार, ५० आमदार निवडून आणायचेत
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील संघाचे कार्यालय काही वर्षांपूर्वी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात होते. याच संघाच्या कार्यालयातून अनेक गरजू लाभार्थींना कर्ज मिळत होते. मात्र, काही वर्षात संघाचे अर्थकारण बिघडले नि तेथील राजकारणही थांबले.
काही महिन्यांपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड झाली. अल्प मतात असणाऱ्या संचालकांनी विरोधकांना फोडत शुभम घाडगे यांना अध्यक्ष केले. मात्र, निवडीनंतर लगेच संचालक मंडळातील बेबनाव उघड झाला.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत सह्यांचे अधिकार अध्यक्ष घाडगे यांच्याऐवजी नंदकुमार ससाणे व संजय शिंदे या संचालकांना दिले गेले. त्यामुळे तेथील राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली.
संचालक बापूराव गायकवाड म्हणाले, की सचिव येत नाही आणि अध्यक्ष नामधारी असल्याने ते फिरकत नाहीत. शिवाय ज्यांच्याकडे सह्यांचे अधिकार आहेत, ते सचिव नसल्याने काहीच करू शकत नाही. संतोष गोरखे म्हणाले, की सचिवांकडे जिल्ह्यातील पाच खादी ग्रामोद्योग संघाचे कारभार असल्याने त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे सामान्य लोकांची हाल होत आहेत. ज्यांनी कर्जे फेडली आहेत, त्यांना तसे दाखलेही मिळत नाहीत. याबाबत ठोस निर्णय व्हावा.
संबंधित सचिवांकडे इतर तालुक्यांचा कारभार असल्याने ते येत नाहीत. याबाबत त्यांच्या वरिष्ठांनाही कळविले आहे. सहकार विभागातील खादी ग्रामोद्योग संघ ही एकमेव संस्था अशी आहे, की त्याच्या सचिवांचा पगार थेट सरकार करते. याबाबत पुन्हा पाठपुरावा करणार आहे.
- रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, श्रीगोंदे , अहमदनगर