esakal | अखेर कोपरगावमध्ये लॉकडाऊन! फक्त अत्यावश्यक सुविधा राहणार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown in Kopargaon on 28th to 31st August due to corona positive patients

कोपरगाव शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल 736 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अखेर कोपरगावमध्ये लॉकडाऊन! फक्त अत्यावश्यक सुविधा राहणार सुरू

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल 736 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे व दिवसेंदिवस रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहर 28 ते 31 ऑगस्ट या चार दिवसांकरता लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जाहीर केले.

शहरातील विविध दहा भागात कोरोनाचे रुग्ण वाढलेले असून सदर भागात वैद्यकीय पथकाद्वारे घर टू घर तपासणी करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले
१५ दिवसांपासून शहराच्या कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढता आहे. मात्र लॉकडाऊन करावे की नाही करावे या द्विधा मनस्थितीत प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते होते. त्यातच सदर निर्णय कोणी घ्यावा हा देखील प्रश्न होता.

तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होऊन कोपरगाव शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले, सुरुवातीला कोपरगाव शहरात रुग्ण संख्या खूप कमी होती. मात्र आता शहरांमध्ये अधिक रुग्ण असून त्यातही शहरातील दहा भागांमध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

शहरातील टिळक नगर, गांधी नगर, महादेव नगर, समता नगर, निवारा, सुभद्रानगर, सप्तर्षी व काले मळा या भागात वैद्यकीय पथके नेमून त्यांच्या मार्फत या चार दिवसात प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. वयस्कर व वृद्ध व्यक्तींची ऑक्सिजन तपासणी करून जर संशयित आढळल्यास रॅपिड टेस्टसाठी शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे सदर चार दिवसांत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

प्रशासन सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. मूळात रुग्ण व त्यांना उपचार मिळावे यासाठी हा सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे सदर चार दिवसाच्या काळात अत्यावश्यक सुविधा, वैद्यकीय सुविधा, बँका पतसंस्था तसेच दूध( सकाळी 5 ते 8) यावेळेस सुरू असून या काळात सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर