esakal | श्रीरामपूरला ‘या’ दिवसापासून पुन्हा लॉकडाउन; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown to Shrirampur again from 13th September

शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस शहर लॉकडाउन करण्यासाठी शहरवासीय एकवटले.

श्रीरामपूरला ‘या’ दिवसापासून पुन्हा लॉकडाउन; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस शहर लॉकडाउन करण्यासाठी शहरवासीय एकवटले. या संदर्भात येथील पालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत 13 ते 20 सप्टेंबरदरम्यान शहरात स्वयंस्फूर्तीने लॉकडाउनचा निर्णय येथील व्यापारी, नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. 

स्थानिक प्रशासकीय अधिकारी वगळता नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक संजय फंड, रवींद्र गुलाटी, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, रोटरीचे राजेश कुंदे, मुख्तार शाह, रवी पाटील यांच्यासह व्यापारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सध्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याने कोरोनाचा संसर्गही वाढला आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. यातच शहरातील व्यापारी तसेच बॅंक अधिकाऱ्याचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खबरदारी म्हणून आठ दिवस शहर बंद ठेवण्याची मागणी बैठकीत झाली. शहरातील बाजारपेठेसह विविध दुकाने, व्यवसाय रविवारपासून (ता. 13) आठ दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नगराध्यक्षा आदिक, नगरसेवक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 

बंद काळात दुकाने उघडून कुणी व्यवसाय केल्यास आम्हीही दुकाने सुरू करू, असा इशारा अशोक उपाध्ये यांनी दिला. चांगल्या उपचार सुविधेसाठी आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्‍यक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याची गरज असल्याचे गुलाटी यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी एकमताने लॉकडाउन पाळण्याचे आवाहन छल्लारे यांनी केले. स्थानिक प्रशासनाने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी अहमद जहागीरदार यांनी केली. बैठकीला पोलिस, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने लॉकडाउनची अंमलबजावणी कशी करणार, याबाबत मात्र नागरिकांत संभ्रम आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाउनबाबत अद्याप कुठलाही आदेश आला नाही. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. विनाकारण रस्त्यांवर गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासकीय नियमांचे पालन करावे. स्वयंशिस्त पाळून संसर्ग नियंत्रणात ठेवणे शक्‍य आहे. 
- प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर 

संपादन : अशोक मुरुमकर