खेळणीच्या दुकानांचा झाला खेळ; शनिशिंगणापूरमध्ये चार कोटींचे नुकसान

विनायक दरंदले
Saturday, 26 September 2020

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन शनिशिंगणापुर येथील शनिदर्शन बंद असल्यामुळे गावातील शंभरहून अधीक खेळणीच्या दुकानांचा खेळ झाला.

सोनई (अहमदनगर) : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन शनिशिंगणापुर येथील शनिदर्शन बंद असल्यामुळे गावातील शंभरहून अधीक खेळणीच्या दुकानांचा खेळ झाला. दुकानात पडून राहिलेली चार कोटी रुपयांची खेळणी व इतर साहित्य आता खराब होत आहे. 

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोना संसर्गाच्या धाकाने 17 मार्चला स्वयंभू शनिमुर्ती दर्शन बंदचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून गावातील सर्व दुकानांबरोबरच खेळणीची दिडशे दुकाने कापडी पडदा टाकून बंद केली आहेत. दुकानातील ज्युटच्या पिशव्या, हातातील लहान पर्स, प्लॅस्टिकची खेळणी, बांगड्या, अंगठीसह अनेक शोभिवंत वस्तू सहा महिन्यांपासून पडून आहेत. त्यामुळे अनेक वस्तू खराब झाल्या आहेत.

शनैश्वर देवस्थान मालकीच्या वाहनतळात खेळणीची पन्नास दुकाने आहेत. तर अन्य खासगी वाहनतळात शंभर दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात दहा लाखाहून अधिक किंमतीची खेळणी आहे. सहा महिन्याचा खंड पडल्याने अनेक वस्तूंचा रंग गेला आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटात व्यावसायिक नुकसानीने अधिकच संकटात सापडले आहेत. 

फक्त भाविकांच्याच जीवावर चालणारा हा व्यावसाय मंदीर बंदमुळे अगोदरच अडचणीत असताना दुकानातील खेळणी खराब झाली. अधिक पावसाने इतर वस्तू खराब झाल्या आहेत. 
- गंगाराम फोके, व्यावसायिक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of 4 crore Rs due to closure of shops in Shanishinganapur