esakal | फक्त लढ म्हणा..! वादळी पावसात पडलेला ऊस शेतकऱ्याने दोरीने बांधून पुन्हा केला उभा
sakal

बोलून बातमी शोधा

Loss of sugarcane to farmers due to heavy rains in Shrirapur taluka

वादळी पावसामुळे तालुक्‍यातील विविध भागांत उंच वाढलेला ऊस आडवा होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

फक्त लढ म्हणा..! वादळी पावसात पडलेला ऊस शेतकऱ्याने दोरीने बांधून पुन्हा केला उभा

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : वादळी पावसामुळे तालुक्‍यातील विविध भागांत उंच वाढलेला ऊस आडवा होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माळवाडगाव शिवारातील सोन्याबापू पाटीलबा चव्हाण या हाडाच्या शेतकऱ्याने मात्र हार न मानता कुटुंबाच्या मदतीने सुमारे एक हेक्‍टरवरील आडवा झालेला ऊस अवघ्या पाच दिवसांत नायलॉन दोरीच्या सहाय्याने मोळ्या बांधून पुन्हा उभा केला. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची एकच चर्चा होत आहे. 

शेतकरी चव्हाण यांनी प्रारंभीपासून उसाची चांगली निगा राखली. कोंबडी खतासह रासायनिक खतांची मात्रा दिली. त्यामुळे उंचच उंच वाढलेल्या उसाला वादळी पावसाची नजर लागली. तो जमिनीवर आडवा झाला. वादळी पावसामुळे उसासह कापूस, मका, बाजरी पिकांचेही मोठे नुकसान झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा वादळी पाऊस होणार असल्याच्या शक्‍यतेनंतरही चव्हाण यांनी उसाला उभे करून बांधण्याची हिंमत दाखविली.

चव्हाण यांनी पत्नी, दोन मुलगे व सुनेच्या मदतीने पाच दिवसांत एक हेक्‍टरवरील ऊस नायलॉन दोरीच्या सहाय्याने मोळ्या बांधून पुन्हा उभा केला. वाढलेल्या उसात साप, विंचू, मधमाश्‍यांपासून बचाव करीत चव्हाण कुटुंबाने उसाला उभे केले. ऊस तोडणीसाठी अद्याप दोन महिने अवकाश आहे. पावसामुळे आडव्या झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. उंदरासारखे प्राणी ऊस पोखरत असल्यानेही वजन घटून आर्थिक नुकसान होते. मात्र, चव्हाण यांनी तो पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न केले. 

इतरांनी उडवली खिल्ली 
वास्तविक, वादळी पावसाने जमिनीवर पडलेली ज्वारी, बाजरी, मका असे धान्यवर्गीय पिके उभी केली जातात. मात्र, वादळामुळे खाली पडलेल्या उसाला उभे करण्याचा प्रयोग चव्हाण यांनी प्रथमच राबविला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडविली. मात्र, आता त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर