
नगरसेविका मोनाली तोटे व उद्योजक ओंकार तोटे यांच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन, ब्युटी पार्लर किट आणि केक बनवण्याचे यंत्र सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
कर्जत : कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये तोटे दांपत्याने महिला भगिनींना मोफत ब्युटी पार्लर कीट, शिलाई मशीन आणि केक बनवण्याचे यंत्र ,वस्तू मोफत भेट देत स्वयं रोजगारातून त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचे काम केले.
महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेत फॅशन डिझायनिंगसह विविध उपक्रमांचे मोफत प्रशिक्षण सुरू करणार आहोत, असे प्रतिपादन बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.
येथील प्रभाग सहाच्या नगरसेविका मोनाली तोटे व उद्योजक ओंकार तोटे यांच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन, ब्युटी पार्लर किट आणि केक बनवण्याचे यंत्र सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
या वेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे,तालुकाध्यक्ष प्रा.किरण पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका मीनाक्षी साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहिनी घुले, नगरसेविका मनीषा सोंनमाळी, तात्या ढेरे, डॉकटर्स संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ. शबनम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, या प्रभागात नगरसेविका मोनाली तोटे यांचे काम अत्यंत चांगले आहे. नागरिकांना त्यांच्या घराच्या दरवाजावर स्वतःच्या नावाचा फलक, जेष्ठांना बसण्यासाठी बाक, तक्रारी व अडचणींचे तत्काळ निवारण, सूचनांची अंमलबजावणी अनेक विधायक काम केले आहे.
मोनाली तोटे म्हणाल्या, प्रभाग आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. महिलांना केंद्रस्थानी मानीत उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने केलेली उपाययोजना यासह केलेला विकास हाच मुद्दा घेत आगामी निवडणुकीत मी सामोरी जाणार आहे. मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, तो मी कामातून सार्थ ठरविला आहे. इथून पुढे त्याला मी तडा जाऊ देणार नाही.
या वेळी बाळासाहेब साळुंखे मीनाक्षी साळुंके, मोहिनी घुले, मनीषा सोनमाळी, तात्या ढेरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा.किरण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गजेंद्र यादव यांनी केले. आभार मोनाली तोटे यांनी मानले.
संपादन - अशोक निंबाळकर