शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारपासून जमा होणार नुकसानीचे पैसे

राजेंद्र सावंत
Sunday, 15 November 2020

अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांत 39 कोटींची नुकसानभरपाई मंजूर केली आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांत 39 कोटींची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर मंगळवारपासून पैसे जमा होण्यास सुरवात होईल, अशी माहिती माजी आमदार चंद्रशेखर घुले व केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिली. 

या वर्षी पावसाळ्यात व नंतरच्या परतीच्या पावसाने शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यांतील अनेक गावांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आम्ही दोघांनी मतदारसंघातील या स्थितीची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली.

दोन्ही तालुक्‍यांतील 76 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. मदतीच्या अनुदानाचा पहिला हप्ता शेवगावसाठी 24 कोटी 23 लाख, तर पाथर्डीसाठी 14 कोटी 21 लाख रुपये प्राप्त झाला आहे. येत्या मंगळवारनंतर दोन्ही तालुक्‍यांच्या तहसील प्रशासनाकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यास सुरवात होईल. 

फुकटचे श्रेय घेऊ नका 
शेवगावच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी, अनुदान मिळाल्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अशी टीकाही घुले व ढाकणे यांनी केली आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Losses will be credited to farmers accounts from Tuesday