नगरी चिमुरड्याच्या गायकीचा बॉलीवूडलाही लळा, बिग बींचंही व्हिडिओ शेअर करीत ट्विट

सनी सोनावळे
Monday, 19 October 2020

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह आदर्श शिंदे, व्ही वेणुगोपाल अशी दिग्गज गायक मंडळी ढवळपुरीच्या चिमुरड्याच्या गायनाच्या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत.

टाकळी ढोकेश्वर ः नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात ढवळपुरी हे दुर्गम गाव आहे. या गावातील अनेकांनी आपल्या गुणांच्या जोरावर वेगळी उंची गाठली आहे. काहीजण तर या गावाचे नाव ऐकले तरी हिणवतात. परंतु येथील एका भूमिपुत्राने सध्या बॉलीवूडसह संपूर्ण सोशल मीडियाचे लक्ष वेधले आहे. 

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह आदर्श शिंदे, व्ही वेणुगोपाल अशी दिग्गज गायक मंडळी ढवळपुरीच्या चिमुरड्याच्या गायनाच्या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत.

त्याचे झाले असे ः ढवळपुरी (ता.पारनेर) येथील परंतु नोकरीनिमित्त सुरत येथे स्थायिक झालेले गायक तान्हाजी जाधव यांच्या तीन वर्षांच्या श्री नावाच्या मुलाच्या गायनाचा सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून ही सर्व त्याच्या प्रेमात पडली आहेत. 

राष्ट्रीय स्तरावरील गायक व्ही वेणुगोपाल,अभिनेते अमिताभ बच्चन,गायक चंद्रकांत पंडीत,आदर्श शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येत नेटक-यांनी त्याचा हा व्हीडिओ शेयर करून त्याच्या गायनाचे कौतुक केले आहे.

गायक तान्हाजी जाधव यांना गायनाचा वारसा वडिलांकडून मिळाला. आता जाधव यांच्या रूपाने घरामध्ये नेहमी गायनाचा रियाज सुरू असतो, हे सर्व त्यांचा तीन वर्षांचा श्री नावाचा मुलगा ही ते नेहमी पाहतो. काल-परवा त्याने वडिलांचा रियाज सुरू असतानाच मला पण गावु द्या असा हट्टच धरला आणि वडिलांमागे गायनास सुरवातदेखील केली. 

गाण्याच्या सरावाचा त्याचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र, सर्व नेटक-यांना तो भावला. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झाल्यानंतर अल्पावधीत नेटक-यांनी हजारोच्या संख्येत त्यास लाईक्स व शेअर मिळाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गायक असणारे व्ही. वेणुगोपाल, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गायक आदर्श शिंदे, चंद्रकांत पंडीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे वृत्तांतमध्येही श्रीच्या गायनाचे कौतुक केले आहे.

बिग बी ट्विट करताना म्हणतात, child is the father of man

ढवळपुरीतील जाधव कुटुंब नोकरीनिमित्त सुरत येथे राहते. तान्हाजी जाधव हे तेथील तापती व्हॅली इंटरनॅशनल विद्यालयात अध्यापन करतात. त्यांची मुलगी श्रेयासुध्दा उत्तम व्हायोलिन वाजवते. मागील वर्षी गुजरात राज्यात स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. श्रीने आपल्या गायनाने तालुक्याचे नाव देशपातळीवर नेले. याचा अभिमान वाटत असल्याचे ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In love with Bollywood Dhawalpuri singer