अगस्ती कारखान्यातर्फे उभे केलेले कोविड सेंटर चांगली सेवा देईल- मधुकरराव पिचड

akola news
akola news
Updated on

अकोले (नगर) : अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेले कोविड सेंटर संभाव्य बाधित कोरोना रुग्णांना चांगली सोई-सुविधा देईल. असा विश्वास माजी मंत्री व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला.

अकोले शहरापासून एक किलोमीटर अंतरावर रेडे शिवारात १00 खाटांचे सेंटर आज विठ्ठल लॉन्स येथे सुरू करण्यात आले. अगस्ती कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या सेंटरचा लोकार्पण सोहळा दुपारी पार पडला. तेव्हा उद्घाटक म्हणून श्री पिचड बोलत होते.

व्यासपीठावर माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर राव घुले, कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य अभियंता नितीन बंगाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

यावेळेस श्री. पिचड पुढे म्हणाले की, हे सेंटर सुरू करण्याचा आपल्याला व संचालक मंडळाला अजिबात आनंद नाही. पण नियतीने निमंत्रित केलेले कोरोनाचे संकट हे आपल्यापुढे वाढून ठेवल्याने हे सेंटर सुरू करण्याला अगस्ती कारखान्याने सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य दिले आहे. या सेंटरला कोणतीही अडचण येणार नाही. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार व देखरेखीखाली हे केंद्र आपली आरोग्य सुविधा देण्याची भूमिका चोख बजावील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नजिकच्या काळामध्ये कारखाना गळीत हंगाम सुरू होणार आहे आणि त्यावेळेला येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसाठीसुद्धा या सेंटरचे उत्तम रीतीने सहकार्य भेटून संभाव्य कोरोना बाधितांना उपचार करील अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सीताराम पा.गायकर म्हणाले की, अगस्ती सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची व तालुक्यातील शेतकऱ्यांची शिखर संस्था आहे. देशावर अनपेक्षित आलेले कोरोनाचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने कारखान्याने पुढाकार घेऊन हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी निश्चित चांगली सुविधा भेटेल. कारखान्याच्या वतीने रुग्णांना नाश्ता, चहापाणी, जेवण दिले जाईल व रुग्ण लवकर बरा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या सेंटरच्या बरोबरच कारखाना पुढाकार घेऊन गळीत हंगामाच्या वेळेस ऊस तोड कामगार यांच्यासाठी मोबाईल ऍम्ब्युलन्सची सेवा देईल. त्यामध्ये डॉक्टर, सिस्टर व अन्य सुविधा असतील. व जेथे जेथे ऊसतोड कामगारांची वसाहत असेल किंवा अन्य ठिकाणी कारखान्यांच्या जवळपास असणाऱ्या रुग्णांना ही सेवा मिळू शकेल. या संकटातून बाहेर येण्यासाठी जनतेने मदत करावी. दानशूर व्यक्तींनी दोन लाख रुपयांची मदत केली आहे, असे त्यांनी जाहीर केले.

माजी आमदार वैभव पिचड यांनी यावेळेस बोलताना बाधित रुग्णाला वेळ पडल्यास अन्य ठिकाणी हलवण्यापूर्वी प्राथमिक उपचार करू शकणारे हे सेंटर असेल. या सेंटरमध्ये नाममात्र फी शासन घेईल असे स्पष्ट करून प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यावी आणि विघ्नहर्त्या गजाननाने कोरोना विषाणूचा नायनाट करावा अशी श्री गणेशाकडे त्यांनी प्रार्थना केली.

तहसीलदार मुकेश कांबळे यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याने देऊ केलेल्या मदतीचा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र पहिल्या टप्प्यातील काळजी घेणारे अकोले तालुक्यातील लोक आता बेफिकीर झाल्याबद्दल चिंता त्यांनी व्यक्त केली. सध्या पाचशेच्या आसपास रुग्ण पोहोचले असून त्यापैकी १४0 रुग्ण आहेत आणि या स्थितीतही ९८% रूग्ण सामान्य स्थितीत आहेत. तर दोन टक्केच लोकाना व्हेंटिलेटर  देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले.

श्री कांबळे यांनी यावेळेस बोलताना हा कसोटीचा काळ आहे आणि लोकांची आर्थिक क्षमता नाही. अशा वेळेस तोंडाला मास्क बांधावा. विनाकारण फिरण्याचा मोह टाळावा अशी सूचना केली.

प्रास्ताविक कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी केले. तर संचालक अशोकराव देशमुख यांनी आभार मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com