मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आवडला शनिशिंगणापूरचा वडापाव

विनायक दरंदले
Friday, 1 January 2021

मुख्यमंत्री चौहान, पत्नी साधना व मुले कृणाल व कार्तिकेयसह शनिदर्शन आटोपून शिर्डीकडे जाताना ते बसस्थानक परिसरात वडापाव खाण्यासाठी थांबले.

सोनई : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व त्यांच्या परिवाराने नववर्षानिमित्त शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले.

सायंकाळच्या आरतीला ते उपस्थित होते. दरम्यान, सोबत बंदोबस्ताचा मोठा लवाजमा असतानाही, चौहान यांनी येथील एका हातगाडीवर थांबून वडापावचा आस्वाद घेतला. 

मुख्यमंत्री चौहान, पत्नी साधना व मुले कृणाल व कार्तिकेयसह शनिदर्शन आटोपून शिर्डीकडे जाताना ते बसस्थानक परिसरात वडापाव खाण्यासाठी थांबले. तेथील वनिता व वैष्णवी कुसळकर यांनी त्यांचे औक्षण केले. अशोक कुसळकर यांनी त्यांचा सन्मान केला. तेथे त्यांनी वडापावची चव चाखली.

सुरक्षा, बंदोबस्त असला, तरी आनंदाचे क्षण आहेत, तेथे मी आवर्जून जातो. येथील वडापावची चव हवीहवीशी वाटल्याने थांबलो, असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले. तसेच साईदर्शन आणि शनिदर्शनाने वर्षभराची ऊर्जा येते. त्यामुळे न चुकता 15 वर्षांपासून एक जानेवारीची वारी चुकवित नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री चौहान यांनी परिवारासह उदासी महाराज मठात अभिषेक व आरती घेतली. देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावो, अशी प्रार्थना शनिदेवाला केल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, नववर्षानिमित्त आज सकाळपासून शनिदर्शनासाठी गर्दी झाली होती. ब्राम्हणी, वंजारवाडी, सोनई व शिंगणापुरात अनेकदा वाहतूक कोंडी झाली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh Chief Minister likes Shanishinganapur's Vadapav