esakal | महाविकास आघाडीने बाजी पलटवली, भाजपचे सत्तेचे स्वप्न विरले
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi took over the power of Nagar District Bank

दोन्ही ठिकाणी थोरातांचाच "वॉच' होता. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून अजितदादांचे मार्गदर्शन सुरू, असेच कालचे चित्र होते.

महाविकास आघाडीने बाजी पलटवली, भाजपचे सत्तेचे स्वप्न विरले

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने काटशह दिला आहे. सुरूवातीला भाजपच्या बाजूने झुकलेली ही निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या बाजूने खेचून आणली.  माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

दिग्गज असूनही गेम फसला

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्यांची मोट बांधली होती. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते अशी दिग्गजांची फळी होती. मात्र, यातील सर्वच नेते महसूलमंत्री थोरात यांच्या गटात गेले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले. बिनविरोध निवडले गेलेले बहुतांशी सदस्य हे महाविकास आघाडीचे आण त्यांना मानणारे आहेत. त्यामुळे भाजपकडे बँक खेचून आणण्यात विखे पाटलांना अपयश आले. एक अपवाद वगळता विखे पाटलांना बँकेत सत्ता मिळवता आलेली नाही.

हेही वाचा - लंघे यांनी माघार घेतली नसती तर गडाख यांनी प्लॅन बी तयार ठेवला होता

अखेरच्या दिवशी सगळं शिजलं

उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. नंतर मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. जागा बिनविरोध होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेच "किंगमेकर' ठरल्याचे मानले जाते. 

यांचे योगदान मोठे

जिल्हा सहकारी बॅंकेचा विस्तार करण्यात बाळासाहेब थोरात यांचे वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा मोलाचा वाटा राहिला. तेव्हापासून काही वर्षे वगळता थोरात कुटुंबीयांचेच बॅंकेवर वर्चस्व राहिले आहे. बाळासाहेब भारदे, आबासाहेब निंबाळकर, फिरोदिया कुटुंब, घुले पाटील यांचे बँकेत योगदान मोठे आहे.

सतरा जागा बिनविरोध

या वर्षी राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी असल्याने, जिल्हा बॅंकेतही त्याचा कित्ता गिरविण्यात आला. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी लढत होईल, असे चिन्ह होते. त्याचे प्रत्यंतर आज आले. अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी आज बॅंकेच्या 21 जागांपैकी तब्बल 17 जागा बिनविरोध झाल्या. केवळ चार जागांसाठी लढती होणार आहेत. 

पिचड यांना पाडले एकाकी
अर्ज भरतानाच आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब म्हस्के बिनविरोध झाले. तसेच, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले हेही बिनविरोध झाले. त्यानंतर बिनविरोध निवडी होण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेक जागांसाठी सूत्रे हलविल्याचे बोलले जाते. अकोले तालुक्‍यात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना धडा शिकविण्यासाठी त्यांचेच कार्यकर्ते असलेले जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांना बिनविरोध होण्याचा मार्ग पवार यांनी मोकळा करून दिला.

गायकरांना संधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने तेथील अर्ज मागे घेतल्याने गायकर बिनविरोध झाले. त्यामुळे गायकर यांना पिचडांपासून वेगळे करण्याचा हा डाव असल्याचे स्पष्ट झाले. 
जामखेड तालुक्‍यात भाजपचे अमोल राळेभात बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून, म्हणजेच अजित पवार यांच्याच इशाऱ्याने राळेभात यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. 

काळे-कोल्हेंची दिलजमाई
थोरात यांच्याच प्रयत्नामुळे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही बिनविरोध निवडले गेले. श्रीरामपूरमधून माजी आमदार भानुदास मुरकुटे व युवा नेते करण ससाणे हेदेखील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही, थोरातांमुळेच बिनविरोध निवडले गेले. 

मोनिकाताई आणि अनुराधाताई

आमदार मोनिका राजळे यांच्या बिनविरोधसाठी थोरातांनीच प्रयत्न केल्याचे मानले जाते. श्रीगोंद्यातून कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांनी पवार व थोरातांच्याच मार्गदर्शनाखाली बिनविरोधचा टप्पा गाठला. 

बैठकांवर होती थोरातांची नजर
शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या बंगल्यावर मंत्री थोरात व तनपुरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. याच वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावर माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार सुधीर तांबे यांच्या बैठका सुरू होत्या. म्हणजे दोन्ही ठिकाणी थोरातांचाच "वॉच' होता. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून अजितदादांचे मार्गदर्शन सुरू, असेच कालचे चित्र होते. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी थोरातांच्या माध्यमातून प्रयत्न केले; मात्र तनपुरे यांच्यामुळे अजितदादांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असे राजकीय वर्तुळातून मानले जाते. 

loading image