esakal | पत्नी, चिमुरडा नियतीसमोर हतबल; पित्याचा डोळ्यांदेखत बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

man drowned

पत्नी, चिमुरडा नियतीसमोर हतबल; पित्याचा डोळ्यांदेखत बुडून मृत्यू

sakal_logo
By
पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : पाय घसरून एक जण तलावात पडला. तलावाच्या काठावरील पत्नी व पाच वर्षांच्या चिमुरड्याने हंबरडा फोडला. बघ्यांची तोबा गर्दी जमली; परंतु कोणालाच पोहता येत नसल्याने सर्व जण हतबल ठरले. डोळ्यांसमोर पतीला पाण्यात बुडताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग पत्नीवर ओढवला. एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला... (man drowned in front of his wife and child in rahuri)


भानुदास जनार्दन निकाळजे (वय ४०, रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना) असे मृताचे नाव आहे. आज (बुधवारी) दुपारी राहुरी कारखाना येथे डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या पेपर मिलसमोरील तलावात ही घटना घडली. तलावात मासे पकडण्यासाठी निकाळजे कुटुंब आले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजता तलावाच्या काठावर जेवण केले. त्यावेळी कारखाना सुरक्षारक्षकांनी त्यांना ‘येथे थांबू नका,’ असे बजावले. सुरक्षारक्षक निघून गेले. जेवण झाल्यावर निकाळजे मासे पकडण्यास गेले. दुपारी तीन वाजता त्यांचा पाय घसरला. तलावातील एका लोखंडी अँगलला आदळून निकाळजे पाण्यात पडले. तलावात सुमारे चार-पाच फूट गाळ, त्यावर दहा-बारा फुटांपर्यंत पाणी आहे. निकाळजे यांचे डोके गाळात रुतल्याने त्यांना वर येता आले नाही.


डोळ्यासमोर नवरा पाण्यात पडल्याने पत्नी व मुलाने हंबरडा फोडला. बघ्यांची तोबा गर्दी जमली. कारखान्याचे सुरक्षारक्षक, पोलिस व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पट्टीच्या पोहणारांनी तलावात शोध घेतला. पावसाने शोधकार्यात व्यत्यय आला. सायंकाळी चार वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. निकाळजे यांच्या मागे आई, आजी, पत्नी, एक मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे.

(man drowned in front of his wife and child in rahuri)

loading image
go to top