मांडओहळ धरण परिसरातील रूई चोंडा धबधबा ठरला आकर्षणाचे केंद्र: सोशल नेटवर्किंग साईटवर छायाचित्रे व्हायरल 

सनी सोनावळे 
Wednesday, 5 August 2020

पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखाली असणा-या छोट्या ओढ्यांनी नैसर्गिकरीत्या अतिशय मनमोहक असा रूई चोंडा ओढा धबधबा तयार झाला आहे.  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने स्थानिक नागरिकांनी याचे छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर टाकल्यानंतर याची माहीती पर्यटकांना झाली.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुक्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. ज्यातील काही दूर्लक्षित राहीले तर काही खूप प्रचलित झाले आहेत.

पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखाली असणा-या छोट्या ओढ्यांनी नैसर्गिकरीत्या अतिशय मनमोहक असा रूई चोंडा ओढा धबधबा तयार झाला आहे.  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने स्थानिक नागरिकांनी याचे छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर टाकल्यानंतर याची माहीती पर्यटकांना झाली.

मांडओहळ धरणाच्या वरती असणा-या शासकीय विश्रामगृह जवळून असणा-या शेजारील कच्या रस्यावरून या धबधब्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी नैसर्गिक रीत्या अंत्यत सुंदर अशी जागा तयार झाली आहे. ढोकी येथे असणा-या पांडवकालीन ढोकेश्वर मंदिराच्या निर्माण वेळी या रूई चोंडा ठिकाणी देखील पांडव राहीले होते. त्यांनीच ही नैसर्गिक जागा निर्माण केली आहे, असेही येथील स्थानिक सांगतात. या धबधब्या जवळच छोटी गुहे सारखी जागा आहे. तेथेच एक मळगंगा देवीचे मंदीर देखील आहे.

येथील नागरिक तिथे जत्रा देखील भरवतात. कितीही पाऊस असला तरी हे मंदिर पाण्याखाली जात नाही. येथे जुन्या काळात जागरण गोंधळ पार पडल्यानंतर वरती येतानाच परीसरात पाऊस सुरू होतो. अशी भावना येथील मळगंगा देवीच्या भाविकांनी व्यक्त केली, येथे स्थायिक नागरिक मासेमारीचा देखील व्यवसाय करतात. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी येण्याचे सध्या तरी टाळावे असे स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandohal Dam in Parner taluka has become a center of attraction