गेल्या महिन्यात रद्द झालेला पदवीधर ऋतुजाचा विवाह आता नियोजीत दिवशीच होणार

सचिन सातपुते 
Monday, 24 August 2020

मोल मजूरी करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटूंबातील मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी दुचाकीवर निघालेल्या आई वडीलांचा अपघाती मृत्यू झाला.

शेवगाव (अहमदनगर) : मोल मजूरी करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटूंबातील मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी दुचाकीवर निघालेल्या आई वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे अनाथ झालेल्या कळसपिंप्री (ता. पाथर्डी) येथील तीन भावंडांच्या मदतीसाठी शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीम धावून आली असून त्यांनी रोख रक्कम व वस्तुरुपात मदत देत त्यांना दिलासा दिला आहे. 

कळसपिंप्री येथील संजय व योगिता गाडे हे दामप्त्य मोलमजूरी करुन कुटूंबाची उपजिवीका भागवत होते. त्यांना पदवीचे शिक्षण घेणारी ऋतुजा, बारावीत असलेली प्रतिक्षा या दोन मुली व दहावीत शिक्षण घेणारा धनंजय एक मुलगा अशी तीन आपत्य आहेत. यातील मोठी मुलगी ऋतुजा हीचा विवाह जुलै महिन्यात पागोरी पिंपळगाव येथील जयदीप आरोळे या युवकाशी ठरला होता. कुटूंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना गाडे दामप्त्य लग्नाच्या खरेदीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी पागोरी पिंपळगाव येथे दुचाकी वरुन चालले असतांना त्यांना कोरडगाव शिवारात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जीव गमवावा लागला. कुटूंबातील सुखाचा प्रसंग अपघाताने क्षणात बदलून तीन भावंडांना अनाथ करुन गेला. 

मुलांची जबाबदारी वयोवृध्द अजी कलाबाई व आजोबा भिमराज गाडे यांच्यावर आली. वाटयाला अवघी दहा गुंठे जमीन आणि तीन मुलांचे शिक्षण लग्न अशा भीषण खर्चात सापडलेल्या या कुटूंबाच्या मदतीसाठी शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीमचे पदाधिकारी व सदस्य धावून आले आहेत. प्रतिक्षा व धनंजय या दोन भावंडांच्या बँक खात्यात प्रत्येकी 15 हजार रुपये टाकण्यात आले. तर अपघातामुळे गेल्या महिन्यात रद्द झालेला पदवीधर ऋतुजाचा विवाह नियोजीत दिवशी म्हणजे येत्या 30 आँगस्टला पार पडणार आहे. त्यामध्ये लागणाऱ्या गृहउपयोगी वस्तुंची भेट ही मराठा वर्ल्ड टीमकडून दिली जाणार आहे.

आई वडीलांशिवाय हा विवाह होणार असल्याने. समाजातील दानशूर व्यक्तींमुळे या भावी दामप्त्यांना व अनाथ मुलांना नक्कीच बळ देणारा आहे. या भावंडांच्या मदतीसाठी समाजातील आणखी ही दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. असे आवाहन मराठा वर्ल्ड टीमने केले आहे.

यांनी स्विकारले पालकत्व 
कुटूंबातील बारावीत शिकणारी प्रतिक्षा व दहावीत शिकणारा धनंजय या दोघांचे या पुढील शैक्षणिक पालकत्व आधार फाऊंडेशन व माजी प्राचार्य दिलीप फलके यांनी स्विकारले आहे. त्यांचा शिक्षणाचा यापुढील सर्व खर्च ते करणार आहेत. तर ऋतूजाच्या विवाह प्रसंगी वाघोली येथील युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग अन्नदान करणार आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha World team from Shevgaon helps three siblings in Kalaspimpri