esakal | सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार दसरा दिवाळी सणांच्या अगोदरच गर्दीने फुलणार
sakal

बोलून बातमी शोधा

आठवडी_बाजार

आता हळूहळू लॉकाडाऊन शिथील होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता गेली सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार सुरू होत आहेत.

सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार दसरा दिवाळी सणांच्या अगोदरच गर्दीने फुलणार

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार सुरू होणार आहेत. पुन्हा एकदा बाजारपेठा गर्दीने अनेक दिवसांनतर फुलून जाणार आहेत. मात्र आता लोकांची जबाबदारी वाढली आहे. आगामी येणा-या दसरा दिवाळी या सणांच्या अगोदरच बाजारपेठा सुरू होणार असल्याने त्या गर्दीने फुलणार आहेत. मात्र यातून कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येकाने आपआपली काळजी घ्यावी लागणार आहे.

देशात व राज्यातही गेली सात महिने कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यात अनेकांचे जीव गेले तर अनेकांनी या आजारावर मात केली. मात्र या आजारावर मात करत असताना त्यांचे खिसेही खाली झाले. सरकारने लॉकडाऊन केले. त्यामुळे या आजाराच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणात अटकाव झाला. मात्र आता हळूहळू लॉकाडाऊन शिथील होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता गेली सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार सुरू होत आहेत.

तालुक्यात पारनेर शहरासह सुपे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी व ढवळपुरी या ठिकाणचे आठवडे बाजार खूप मोठे आहेत. या शिवाय तालुक्यात इतरही अनेक गावात जवळा, खडकवाडी, रांजणगाव मशीद या गावांसह अनेक गावात छोटे आठवडे बाजारही भरतात. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी निश्चितच धोकेदायक ठरू शकते.

बाजार सुरू झाल्याने अनेक व्यापा-यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. गेली सात महिने अनेकांचे आठवडे बाजार बंद झाले आहेत. अनेक व्यापारी गावोगाव आठवडे बाजारात जाऊन विविध वस्तू किंवा कापड साहित्य विक्रीचा व्यापार करतात. व त्यावर आपला उदरनिर्वाह निर्वाह करतात. अनेकांचे पोट केवळ बाजार हाटवर आवलंबून आहे.
 
मात्र गेली सात महिने आठवडे बाजार बंद झाल्याने अनेक गावात आता दररोज भाजीबाजार भरू लागला आहे. शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही भाजीबाजाराची संकल्पना या लॉकडाऊनमुळे अस्तित्वात आली आहे. मात्र आता पुन्हा एकदा आठवडे बाजार सुरू होणार असल्याने बाजारात सामाजिक अंतर पाळणे अनेकदा शक्य होणार नाही. बाजारात दसरा व दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर पाळणे गरजेचे ठरणार आहे. किंवा शक्य तितक्या प्रमाणात बाजारात गर्दी असेल त्यावेळी जाणे टाळावे लागाणार आहे.

पारनेरच्या मुख्याधिकारी डॉ.सुनिता कुमावत म्हणाल्या, रविवारी (ता.18 ) पारनेरचा बाजार भरणार असून सर्व सरकारी नियमांचे पालन करून भरविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी नियमांचे पालन करावे. आठवडे बाजाराची जबाबदारी सरकारने स्थानिक प्रशासनावर टाकली आहे. जनतेने या बाबत जागृकता पाळून बाजारात काळजी घ्यावी. 


संपादन - सुस्मिता वडतिले