esakal | कोरोनासाठी ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ उतरणार रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

The Marxist Communist Party will agitate for Corona on Thursday

अकोले तालुक्यात कोरोना तपासण्या व उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत.

कोरोनासाठी ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ उतरणार रस्त्यावर

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात कोरोना तपासण्या व उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. तालुका स्तरावर याबाबत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास गुरुवारी (ता. 10) अकोले तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.

अकोले तालुक्यातील आरोग्य अधिकारी, आशा कर्मचारी व सरकारी आरोग्य यंत्रणेत सक्रिय असलेले विविध घटक आपल्या परीने चांगले काम करत आहेत. मात्र तपासणीची साधने व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांना व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॉबचे रिपोर्ट येण्यासाठी दोन- तीन दिवस लागत असल्याने उपचारात विलंब होत आहे. शिवाय नगरवरून रिपोर्ट उशीरा येत असल्याने दरम्यानच्या काळात संबंधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्गाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 
तालुक्याची स्थिती यामुळे अधिकाधिक बिकट होत आहे. तालुक्यातील कोविड केयर सेंटरमध्येही रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. रुग्णांना सकाळचा नाश्ता दिला जात नाही. आंघोळीला गार पाणी दिले जाते. उपचारही उपलब्ध होत नाहीत.

अशा पार्श्वभूमीवर जिल्हा केंद्रा ऐवजी तालुक्यातच कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्या, खानापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे पुरेसे जेवण, आंघोळीसाठी गरम पाणी व योग्य उपचार उपलब्ध करून द्या, आशा कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, परिचारिका, अर्धवेळ परिचर, आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स यांना सर्व प्रकारची सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्या, कोरोना साथीत कार्यरत असलेले आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणेतील सर्वांना सुरक्षा साधने व बाधित झाल्यास प्राधान्याने उपचार उपलब्ध करून द्या, या मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर