Ahmednagar : झाले प्रकाशाचे मोजमाप; पाइपलाइन रस्त्यावर नगरसेवक एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagar

झाले प्रकाशाचे मोजमाप; पाइपलाइन रस्त्यावर नगरसेवक एकवटले

अहमदनगर : शहरात एलईडी पथदिवे बसविण्यावरून बनलेले गोंधळाचे वातावरण निवळू पाहत आहे. महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर, ठरलेल्या वॉटनुसारच दिवे बसविण्याचे ठेकेदाराने कबूल केले. मात्र, विरोधी पक्षनेते, तसेच नगरसेवकांनी दिव्यांचा दर्जा तपासायचेही ठरविले आणि रात्री साडेदहा वाजता पाइपलाइन रस्त्यावर ‘डेमो’ झाला. नवीन दिव्यांचा प्रकाश चांगला व पुरेसा पडतो का, ठरलेल्या वॉटनुसार दिवे बसविले का, याबाबतची तपासणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या प्रकाशावरून शहरात उलटसुलट चर्चा होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व आयुक्त शंकर गोरे यांनी बैठक घेऊन ठेकेदाराला जुन्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे नवीन स्मार्ट एलईडीचा प्रकाश असण्याबाबत सूचना केल्या. करारनाम्यानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, तसेच नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके यांच्यासह निखिल वारे, बाळासाहेब पवार, गणेश बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, विद्युत विभागप्रमुख वैभव जोशी, ठेकेदार एजन्सीचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पाइपलाइन रस्त्यावर सुरू असलेल्या जुन्या पथदिव्यांच्या प्रकाशाची मोजणी करण्यात आली. त्यामुळे शहरातील दिवे अधिक दर्जेदार बसविले जातील, अशी शक्यता आहे.

हेही वाचा: कोरोना-मृत्यूंचे आकडे जुळेनात

असा होता वाद

दिवाळीच्या आधी संपूर्ण शहर प्रकाशमान होणार, अशी घोषणा पदाधिकाऱ्यांनी केली. दिवाळीच्या आधी एलईडी दिवे बसविण्याचा प्रारंभही झाला. मात्र हे काम संथ गतीने सुरू राहिले. एक महिना लोटला तरीही केवळ अडीचशे दिवे बसविण्यात आले. त्यातही ते नियमाप्रमाणे बसविले नसल्याचा आरोप झाला. शहरात बहुतेक ठिकाणी ६० वॉटचे दिवे बसविण्याऐवजी ३० वॉटचे बसविण्यात आले, असा आरोप काही नगरसेवकांनी केला. त्यानंतर हा वाद महापालिकेत गेला. पुन्हा बैठक होऊन ठेकेदाराला सुनावण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे क्षमतेचे दिवे बसविण्याचा आदेश देण्यात आला. त्यावर विश्वास न ठेवता नगरसेवकांनी दिव्यांची तपासणी करण्याचे धोरण घेतले.

निविदेत ठरल्याप्रमाणेच दिवे बसविण्यात आले पाहिजेत. शहर, तसेच उपनगरांत कोणत्याही दिव्याचा प्रकाश कमी पडल्याचे लक्षात आल्यास संबंधित ठेकेदाराकडून तो बदलून घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत या कामात गय केली जाणार नाही.

- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, मनपा

loading image
go to top