आई- वडिलांना न सांभाळल्यास ३० टक्के पगार कापला जाणार; नगर जिल्हा परिषद सभेत चर्चा

दौलत झावरे
Saturday, 28 November 2020

आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा विचार सुरू आहे.

अहमदनगर : आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा विचार सुरू आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आई- वडिलांच्या खात्यांवर जमा करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत चर्चा झाली.

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला व बालकल्याण समिती सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, संदेश कार्ले, जालिंदर वाकचौरे, शरद नवले आदी उपस्थित होते. सुरवातीला जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. 

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, असे एकूण 55 हजार कर्मचारी आहेत. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्‍कम कपात करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याच धर्तीवर नगर जिल्हा परिषदेनेही निर्णय घेण्याची मागणी परजणे यांनी केली. या विषयावर आगामी सभेत निर्यय होणार आहे. 

कांतीलाल घोडके यांनी शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्याची मागणी केली होती. त्यावर उपाध्यक्ष शेळके यांनी जिल्ह्यातील सर्व शाळाखोल्यांचे निर्लेखन करण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले. लाल टाकी येथील बांधकामाला विरोध नाही; पण घसारा निधी बांधकामावर खर्च केला, तर सगळे संपून जाईल, असे परजणे यांनी म्हटले. 

पंचायत स्तरावरील घसारा निधी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याबरोबर सभापतींच्या वाहनांसाठी निधीची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापती गडाख म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाने लेखा शिर्षनिहाय घसारा निधी देणे आवश्‍यक आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका चालकांच्या पगाराचा मुद्दा जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. त्यावर किमान वेतनाप्रमाणे आगामी काळात पगार देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. 

नेत्यांची जयंती, पुण्यतीथी साजरी करणार 
जिल्हा परिषदेत कर्मवीर शंकरराव काळे यांचा पुतळा उभारण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर चर्चा झाली. रोहिणी निघुते यांनी माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी भाऊसाहेब थोरात यांचाही पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यावर सभापती सुनील गडाख म्हणाले, की याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, तूर्त हा विषय स्थगित ठेवला आहे. त्याऐवजी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या नेत्यांची जयंती व पुण्यतिथी जिल्हा परिषदेतर्फे साजरी करण्यात येणार आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Nagar Zilla Parishad under the chairmanship of Rajshri Ghule