भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शाश्‍वत विकास करणे शक्य

आनंद गायकवाड
Sunday, 29 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन महाविकास आघाडी सरकारची राज्यात यशस्वी घोडदौड सुरू आहे.

संगमनेर (अहमदनगर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन महाविकास आघाडी सरकारची राज्यात यशस्वी घोडदौड सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला मोलाची साथ दिली आहे.

आगामी स्थानिक पातळीवरील निवडणुकांत एकत्र काम केल्यास, सूड आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शाश्वत विकास करणे शक्‍य होईल, असे मत शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केले. शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवत महसूलमंत्री थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला. त्याप्रमाणे संगमनेरच्या शिवसैनिकांनी थोरात व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी नगरपालिका निवडणूक लढविण्यात कोणतीच हरकत नाही. राज्यातील आघाडी सरकारद्वारे राज्याचे हित होणार असेल, तर स्थानिक निवडणुकीतदेखील मंत्री थोरात व नगराध्यक्ष तांबे शिवसेनेला विश्वासात घेऊन काम करतील, अशी आशा आहे.

वरिष्ठांसह जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे निर्णय देतील त्यानुसार तयारीला लागण्याच्या सूचना कतारी यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. संगमनेरमध्ये कोविड संकटात मोठे सेवाकार्य उभे राहिल्याने नागरिकांमध्ये शिवसेनेविषयी विश्वासाचे वातावरण आहे. त्या जोरावर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. या वेळी उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, लखन घोरपडे, रमेश काळे, विकास डमाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Shiv Sena office bearers at Sangamner