शिक्षण मंडळाच्या अनुदानासाठी बैठक मंत्रालयात बैठक घेणार 

गौरव साळुंके
Monday, 30 November 2020

नगरपालिका शिक्षण मंडळाच्या थकीत अनुदानासाठी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या थकीत अनुदानासाठी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. 

शिक्षण मंडळाचे थकीत अनुदान, बीएलओ नियुक्ती, शिक्षण उपसंचालकाकडून वेतनास होणारा विलंब, एमएस सीआयटी मुदतवाढ असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी नगरपालिका शिक्षक संघ, गुरुमाऊली महिला आघाडी आणि तालुका शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या समवेत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर नगरपालिकेत आपण नगराध्यक्ष म्हणून काम केले. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून हा प्रश्न तातडीने सोडवणार आहे. बीएलओच्या कामाबाबत शिक्षकांना आज पर्यंत सक्ती केली. परंतु, यामध्ये सर्व केडरचे लोक सहभागी करून घेण्याबाबत आपण विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिक्षकांनी बीएलओच्या कामाला उच्च न्यायालयाकडून मनाई आदेश घेतला आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून शिक्षकांवर कामाबाबत दबाव आणला जात असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याते ते म्हणाले. सेवानिवृत्ती वेतनास दरमहा होणारा विलंब दूर करण्याची मागणी नगरपालिका पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, शहराध्यक्ष प्रकाश माने यांनी केली. येथील शिक्षकांतर्फे आमदार डॉ. तांबे यांचा सत्कार करण्यात आला. शकील बागवान यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A meeting will be held at the Ministry for the grant of the Education Board