मालमोटारीतून लांबवली सात लाख रूपयांची दूध पावडर

विनायक दरंदले
Friday, 4 December 2020

पांढरीपुल ते नेवासे फाटा दरम्यान नेहमी रस्तालूट 
व चोरीच्या घटना घडत असतात. दमदाटी व चोरीचे मोठे रॅकेट याभागात रात्रभर कार्यरत असल्याने या रस्त्यावर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

सोनई : घोडेगाव (ता.नेवासे) येथील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंप आवारात उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकमधून 7 लाख रुपये किंमतीच्या दूध पावडर गोण्यांची चोरी झाली आहे.

या बाबत पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की,घोडेगाव येथील साई बॅटरी दुकानचे मालक सोहेल शेख (वय-22)याने सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, पेट्रोल पंपाच्या आवारात लावलेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक एम.एच.16 सी.सी.7451 मधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकची मागची ताडपत्री कापून सात लाख 10 हजार 548 रुपये किंमतीच्या 148 गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत.

पांढरीपुल ते नेवासे फाटा दरम्यान नेहमी रस्तालूट
व चोरीच्या घटना घडत असतात. दमदाटी व चोरीचे मोठे रॅकेट याभागात रात्रभर कार्यरत असल्याने या रस्त्यावर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर थोरात अधिक तपास करत आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk powder worth Rs 7 lakh stolen from a vehicle