मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचाच फ्लेक्स हटवला

आनंद गायकवाड
Friday, 1 January 2021

बसस्थानकावर थांबून त्यांनी स्वतःचे छायाचित्र असलेला फलक हटविला. संगमनेर बसस्थानकाचा मध्यवर्ती परिसर सर्व प्रकारच्या जाहिरातींचे केंद्र बनला आहे.

संगमनेर ः गेल्या काही वर्षात संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या फ्लेक्‍सची रेलचेल झाल्याने शहराची ओळख फ्लेक्‍सचे शहर अशी होऊ लागली.

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फलकांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली. आधी स्वतःचे छायाचित्र असलेला नववर्ष शुभेच्छेचा फलक काढून या उपक्रमास प्रारंभ केला. 

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्‍सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची बाब थोरात यांना जाणवली.

बसस्थानकावर थांबून त्यांनी स्वतःचे छायाचित्र असलेला फलक हटविला. संगमनेर बसस्थानकाचा मध्यवर्ती परिसर सर्व प्रकारच्या जाहिरातींचे केंद्र बनला आहे. आज या प्रकाराची महसुलमंत्र्यांनीच दखल घेतल्याने तातडीने सूत्रे हलली. बसस्थानक परिसरातील फलकापासून सुरवात झाली. 

गणेशनगर, सह्याद्री कॉलेज, नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगर रोड, दिल्ली नाका या सर्व ठिकाणी लावलेले फलक आगामी दोन दिवसात काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या सशुल्क परवानगी शिवाय फलक लावण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदींसह नगरपरिषदेचे बाळू कुळधरण, राजेंद्र सुरग, अखलाक शेख, कैलास अभंग आदी उपस्थित होते. या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Balasaheb Thorat removed his own flex